वनडे मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमाल पाहायला मिळणार आहे. ही मालिकेकडे टी20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. यासाठी बुमराह आगामी टी20 मालिका आणि विश्वचषकासाठी जोरदार तयारी करत आहे. त्याच्या या तयारीचा व्हिडीओ नुकतेच मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेयर केला आहे. तो तुफान वायरल झाला असून त्यामागचे कारणही तेवढेच खास आहे.
या व्हिडीओमध्ये बुमराह त्याचा मुलगा अंगदसोबत गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने अंगदलाही चेंडू टाकण्यास सांगितले. झाले असे की बुमराह नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता तेव्हा अंगदही तेथे होता. त्याने मग आपल्या मुलालाही गोलंदाजीचे धडे दिले. अशा या ज्युनियर बुमराहचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेसाठी बुमराहला आराम दिला गेला आहे. त्याच्या वर्कलोड आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला वनडे संघातून डालवले आहे. कारण तो न्यूझीलंडच्या टी20 मालिकेनंतर विश्वचषकही खेळणार असून तो संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. तसेच नंतर त्याला आयपीएलही खेळायचे असल्याने त्याच्यासाठी हा ब्रेक आवश्यक होता.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत पाच सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना 21 जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना 23 जानेवारीला रायपूरला, तिसरा सामना 25 जानेवारील गुवाहाटीमध्ये, चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टणम आणि पाचवा सामना 31 जानेवारीला तिरूअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (फक्त चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यांसाठी), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (विकेटकीपर).






