भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली आहे. भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात देखील आर अश्विनचा मोलाचा वाटा आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात देखील भारतीय संघ अडचणीत असताना आर अश्विनने टॉम लेथमला माघारी धाडले होते. अशातच संघातील वेगवान गोलंदाजाने अश्विनचे तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. यामध्ये अजिंक्य राहणेने सर्वाधिक ४९ धावांचे योगदान दिले तर विराट कोहलीने ४४ धावांची खेळी केली होती. मात्र, या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही खास करता आले नाही. न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावा करण्यात अपयश आले होते.
अश्विनने लावला लेथमच्या खेळीवर ब्रेक
न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टॉम लॅथम आणि डेवोन कॉनवे यांनी न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी डावातील ३० षटकं खेळून काढले होते. दोघांनी मिळून ७० धावा जोडल्या होत्या. त्यानंतर ३५ व्या षटकात आर अश्विनने टॉम लेथमला बाद करत, भारतीय संघाला पहिला गडी बाद करून दिला.(Jasprit bumrah praised off Spinner R ashwin)
जसप्रीत बुमराहने केले कौतुक
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आर अश्विनची स्तुती केली आहे. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की, “मला असे वाटते की, तो या खेळातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. तुम्ही त्याची कामगिरी पाहिली तर तुम्हाला अंदाज येईलच. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा विक्रम आहे आणि हे सहज होत नाही.”
तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी म्हटले की,”तो आपल्या खेळावर खूप मेहनत घेतो. तो नेहमी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. हीच एक बाब आहे जी त्याला इतरांपेक्षा वेगळं करते. ”
कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विनने आतापर्यंत एकूण ७८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४०९ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने २७.९ च्या सरासरीने २६५६ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ अर्धशतक आणि ५ शतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी, ‘या’ चुकांमुळे कसोटी चॅम्पियनशीप जेतेपद धोक्यात!