भारतीय संघाला ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (100th Test Match) असणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना खास असेल. त्याच्या १०० व्या कसोटीबद्दल भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी बुमराह पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला विराटच्या १०० व्या कसोटी सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘कोणत्याही खेळाडूसाठी हे एक मोठे यश आहे. हे त्याच्या मेहनतीचे आणि सर्मपणाचे फळ आहे.’
बुमराहने विराटच्या नेतृत्त्वाखालीच २०१८ साली भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. बुमराह पुढे म्हणाला, ‘आपल्या देशासाठी १०० वा कसोटी सामना खेळणे एक खास क्षण असतो. विराटने भारतीय संघाच्या यशात मोठे योगदान दिले आहे आणि भविष्यातही तो असे करेल. विराटच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मी त्याला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो.’
तसेच बुमराहला विचारण्यात आले की, विराटच्या या खास दिवशी त्याला काय भेट देणार, यावर बुमराह म्हणाला, ‘जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर यापेक्षा चांगली भेट कोणती असू शकत नाही. विराटला एका क्रिकेटपटूच्या रुपात आपले सर्वोत्तम द्यायला आवडेल.’ (Jasprit Bumrah react on Virat Kohli set to 100th Test appearance at Mohali)
????️????️ @imVkohli playing 100 Test matches is testimony to his hardwork and dedication towards the game: @Jaspritbumrah93 ????#TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/6yh13WWkJ3
— BCCI (@BCCI) March 1, 2022
संघाचे लक्ष सामन्यावर – बुमराह
खरंतर या सामन्यासाठी बीसीसीआयने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती. पण मंगळवारी असे समजले की, या सामन्यासाठी स्टेडियममधील आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याबद्दल बुमराह म्हणाला की, ‘जर प्रेक्षक आले, तर त्यामुळे चांगली उर्जा मिळते. पण ही अशी गोष्ट आहे, जी आम्ही नियंत्रित करू शकत नाही. आमच्याकडे त्यासाठी कोणते अधिकार नाहीत, आम्ही नियम बनवत नाही. त्यामुळे आमच्या हातात काय आहे, तर फक्त आमच्यातील उर्जा. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत करतो. सध्यातरी प्रत्येकाच्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आम्ही कशी तयारी करत आहोत.’
अशी होणार कसोटी मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार असून ४ ते ८ मार्च दरम्यान मोहालीत पहिला सामना होईल. तसेच दुसरा सामना १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरुपातील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
नादच खुळा! रोहित शर्माने खरेदी केली लग्झरी कार, किंमत ऐकून पायाखालची सरकेल जमीन
तेजतर्रार राशिद! स्टार्क-ब्रेट लीला मागे सोडत ‘त्या’ विक्रमावर सांगितला हक्क






