भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीचा पहिला दिवस मोठ्या तणावात संपला. शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यात जोरदार वाद झाला. याला भारतीय कर्णधारानं उस्मान ख्वाजाची विकेट घेत उत्तर दिलं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियानं पहिल्या डावात 185 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियानं दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 9 धावा केल्या आहेत. भारताकडे अजूनही 176 धावांची आघाडी आहे. बुमराह आणि कॉन्स्टन्स यांच्यातल्या या गरमा-गरमीनंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यातल्या वादाची घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. चौथ्या चेंडूनंतर उस्मान ख्वाजाला चेंडू खेळायला तयार होण्यासाठी बराच वेळ लागत होता. वास्तविक, दिवसाचा खेळ संपायला फारच कमी वेळ शिल्लक होता आणि भारताला आणखी एक षटक टाकायचं होतं. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेळ काढून दिवसाचा खेळ संपवायचा होता.
जसप्रीत बुमराहनं उस्मान ख्वाजाला चेंडू खेळण्यासाठी लवकर तयार होण्यास सांगितलं, तेव्हा नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या सॅम कॉन्स्टन्स त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या दिशेने जात असताना अंपायरनं मध्ये येऊन त्यांना थांबवलं.
ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. या विकेटनंतर बुमराह थेट 19 वर्षीय कॉन्स्टन्स समोर जाऊन उभा राहिला. दरम्यान, स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीनंही त्याच्या समोरून जात असताना विकेटचं सेलिब्रेशन केलं. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.
JASPRIT BUMRAH IS HEATING. 🙇
– Box office stuff in Border Gavaskar Trophy. pic.twitter.com/WrbIyme7WZ
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2025
भारताकडून फलंदाजी करताना रिषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडनं चार, मिचेल स्टार्कनं तीन आणि पॅट कमिन्सनं दोन गडी बाद केले.
हेही वाचा –
पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावे, टीम इंडिया 185 धावांवर सर्वबाद; शेवटच्या चेंडूवर भारताचे पुनरागमन
रोहित शर्माला ड्रॉप करण्यावर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया; म्हणाला, “संघाच्या हितासाठी….”
“त्याने आपला शेवटचा …”, रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल दिग्गजाचा मोठा दावा