नुकताच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघात पार पडला. या सामन्यात सौराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या, कर्णधार जयदेव उनाडकटने रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण हंगामात शानदार गोलंदाजी केली. यामध्ये त्याने एकून 67 विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या या विकेट्स रणजी ट्रॉफीच्या 86व्या मोसमातील सर्वाधिक विकेट्स ठरल्या आहेत.
उनाडकटच्या (Jaydev Unadkat) या शानदार कामगिरीमुळे त्याला मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये अनेक क्रिकेट तज्ज्ञ त्याला भारतीय संघात घेण्याची मागणी करत आहेत.
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता सुनील जोशींनी (Sunil Joshi) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून उनाडकटची प्रशंसा करत लिहिले की, “सौराष्ट्र संघाचे अभिनंदन. उनाडकटने या मोसमात 67 विकेट्स घेऊन एका चांगल्या कर्णधाराचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. चेतेश्वर पुजारानेही आपला शांत स्वभाव आणि संघाला कठीण परिस्थितीत सांभाळण्याचा अनुभव दाखविला आहे.”
जोशींच्या या ट्वीटनंतर कुठेतरी उनाडकटची 10 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची चिन्हे दिसत आहेत. उनादकटने आतापर्यंत भारतासाठी केवळ 1 कसोटी सामना खेळला आहे. हा सामना त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक कारसन घावरी (Karsan Ghavri) यांना असे वाटते की, उनाडकटला भारतीय संघात आणखी एक संधी मिळाली पाहिजे. घावरी यावेळी म्हणाले की, गोलंदाजी करताना उनाडकट चेंडूला आत आणण्याव्यतिरिक्त बाहेरही घेऊन जात आहे. मागील काही मोसमांपासून तो चांगली कामगिरी करत आहे.
त्याची फीटनेसही पहिल्यापेक्षा चांगली आहे. आता तो अनेक तास-न-तास गोलंदाजी करू शकतो. तो नवीन चेंडूबरोबरच जुन्या चेंडूनेही चांगली गोलंदाजी करत आहे. अशामध्ये कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो.
सौराष्ट्र (Saurashtra) संघाला रणजी ट्रॉफीत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिल्यानंतर उनाडकट म्हणाला की, “मलाही भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे. कारण माझी उत्सुकता खूप वाढली आहे. ही उत्सुकता मला रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण मोसमात प्रोत्साहित करत होती. खरं सांगायचं तर, सत्रामध्ये चमकदार खेळायला बरीच शारिरीक आव्हाने होती. जवळपास सर्वच सामन्यांमध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून इतके लांब स्पेल टाकणे खूप आव्हानात्मक होते.”
सध्या उनाडकट चांगल्या लयीत आहे. तसेच 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या कसोटी संघात खेळताना दिसू शकतो. त्याचबरोबर त्याने भारतासाठी शेवटचा आंतरष्ट्रीय टी20 सामना 2018मध्ये खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
– क्रिकेटपासून दूर असलेला अश्विन चेन्नईकरांवरच भडकला
– भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा हा एकमेव क्रिकेटपटू माहित आहे…
– या दोन टीम इंडियाच्या गोलंदाजांचं नाव जरी ऐकलं तरी फिंच झोपेतून उठून…