इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, त्याच्या झंझावती आणि स्विंग गोलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. पण शुक्रवारी (३ सप्टेंबर) त्याने लंडनच्या केनिंग्टन ओव्हलमध्ये भारताविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात खेळताना फलंदाजीत विशेष कामगिरी केली आहे. पहिल्या डावात भारताच्या १९१ धावांचे प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा डाव २९० धावांवर संपला. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ९९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
इंग्लंडची शेवटची विकेट ख्रिस वोक्सच्या रूपात पडली, तो ५० धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. इंग्लंडकडून अँडरसन एका धावेवर नाबाद राहिला. यासह अँडरसनने नाबाद राहण्याच्या बाबतीत एक खास ‘शतक’ ठोकले आहे.
अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये १०० वेळा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हा एक विक्रम आहे, जो जगातील महान फलंदाज देखील बनवू शकलेले नाहीत. विशेष गोष्ट म्हणजे, या यादीत त्याच्या आसपास देखील दुसरा कोणताही खेळाडू नाही. त्याच्यानंतर जो खेळाडू या यादीत आहे, त्याच्या आणि अँडरसनमध्ये ३९ आकड्यांचा फरक आहे. अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाबाद राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्शच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम ६१ वेळा केला आहे.
या यादीत सामाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंबद्दल माहिती घ्यायची तर, बहुतेक गोलंदाजच त्यात सामील आहेत. अँडरसन आणि वॉल्श व्यतिरिक्त यात मुथय्या मुरलीधरन, बॉब विलिस, ख्रिस मार्टिन, ग्लेन मॅकग्रा आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या नावांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात अँडरसनने घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. अँडरसन इंग्लंडमध्ये आपला ९५ वा कसोटी सामना खेळत आहे. तर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत भारतीय भूमीवर एकूण ९४ कसोटी सामने खेळले होते. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये ९२ कसोटी सामने खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताकडून घोडचूक, मोईन बाद होऊनही केली नाही अपील; इंग्लंडला फुकटात मिळाल्या ७२ धावा!
विराटची बातच न्यारी! मैदानावर नाही, पण सोशल मीडियावर ‘हा’ पराक्रम करणारा पहिला आशियाई सेलिब्रेटी
ओव्हलच्या मैदानावर उमेश यादवचा मोठा कारनामा! ‘या’ विक्रमाच्या बाबतीत केली जहीर खानची बरोबरी