मुंबई । साऊथँम्पटन येथे झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत जो रुटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्सला इंग्लंडचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते, परंतु इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजकडून 4 गडी राखून पराभूत झाला. या विजयाबरोबर वेस्ट इंडिजने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हा सामना हातातून निसटत असल्याचे लक्षात आल्यावर इंग्लंडचा प्रभारी कर्णधार स्टोक्सने स्लेजिंगला सुरुवात केली होती. पण वेस्ट इंडिज संघावर याचा कसलाही फरक पडला नाही. याबद्दल त्या सामन्यातील दुसर्या डावात 95 धावा ठोकणारा जार्मेन ब्लॅकवुडने खुलासा केला आहे.
ब्लॅकवूड ‘विस्डेन’शी बोलताना म्हणाला की, “कर्णधार बेन स्टोक्स मला पहिल्याच चेंडूपासून काहीतरी बोलत होता. स्टोक्सला वाटत होते की, मी चुकीचा फटका मारून बाद होईल. परंतु मी कधीही लक्ष विचलीत होऊ दिले नाही. मी खेळपट्टीवर होतो तेव्हा माझ्यावर दबाव नसून त्याच्यावर होता. मला माहित आहे की तो मला वाईट चेंडू टाकू शकत नाही. तो काय म्हणत होता ते मला आठवत नाही. परंतु त्याने काही वाईट बोलले नाही. हे क्रिकेट आहे. आपल्याला नेहमीच काहीतरी ऐकायला मिळते आणि हा खेळ अशा प्रकारे खेळला जातो.”
दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना विंडीजने 12 षटकांत 27 धावा देऊन तीन गडी गमावले होते, पण ब्लॅकवुडने अखेरच्या दिवशी रोस्टन चेस आणि शेन डोरिच यांच्यासह दोन महत्त्वपूर्ण भागीदारी करत हा सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने फिरवला. तथापि, विंडीजला विजयासाठी अवघ्या 11 धावांची गरज असताना ब्लॅकवूड बाद झाला. तो जेम्स अँडरसनच्या चेंडूवर मिडऑफला झेलबाद झाला आणि त्याचे पाच धावांनी शतक हुकले.
दुसरीकडे विंडीजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनीही ब्लॅकवुडचे कौतुक केले. सिमन्स म्हणाले की, “इंग्लंड हे करत असेल असे मला वाटत नव्हते. परंतु ब्लॅकवुडने विचलित न होता संयम ठेवला आणि परिस्थितीनुसार खेळला. हे दर्शविते की त्याची मानसिकता सुधारत आहे.”
गुरुवारपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे दुसरी कसोटी सुरू होईल.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेट सुरु होऊन इतके वर्षे लोटली पण ‘हा’ विक्रम केलाय केवळ एकाच संघाने
३२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची विंडीजला संधी; करावे लागेल फक्त हे एक काम
कोरोनाचा मोठा फटका; भारतीय संघाला खेळताना पहायचे असेल, तर पहावी लागू शकते एक वर्ष वाट






