पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना झारखंड आणि हरियाणा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हरियाणाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, झारखंडच्या संघाने हा निर्णय चुकीचा ठरवत 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 262 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ केवळ 193 धावाच करू शकला आणि 69 धावांनी त्यांचा पराभव झाला. याचसह इशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने इतिहास रचला आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या झारखंड संघासाठी कर्णधार आणि सलामीवीर इशान किशनने केवळ 49 चेंडूत 101 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकार ठोकले. दुसरा सलामीवीर विराट सिंग मात्र केवळ 2 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुमार कुशाग्रने अवघ्या 38 चेंडूत 81 धावांची खेळी साकारली. कुशाग्रने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार जडले. डावाच्या अखेरीस अनुकूल रॉयने 20 चेंडूत नाबाद 40 धावा, तर रॉबिन मिंजने 14 चेंडूत नाबाद 31 धावांचे योगदान दिले. या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर झारखंडने 29 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 262 धावा कुटल्या.
उत्कृष्ट फलंदाजीनंतर झारखंडच्या गोलंदाजांनीही कमाल करून दाखवली. पहिल्याच षटकात विकास सिंगने हरियाणाच्या 2 स्टार फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर यशवर्धन दलालने 22 चेंडूत 53 धावांची खेळी केली, तर त्याला साथ देताना निशांत सिंधूने 15 चेंडूत 31 धावा जोडल्या. सामन्याच्या अखेरीस सामंत जाखडनेही 17 चेंडूत 38 धावा केल्या.
मात्र, तरीदेखील हरियाणाचा संघ 193 धावांवरच गारद झाला आणि त्यांना 69 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह झारखंडच्या संघाने पहिल्यांदाच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे.






