टॉन्टन। बुधवारी (३० जून) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ५ विकेट्ने विजय मिळवत ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात जरी भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का बसला असला तरी या सामन्यादरम्यान झुलन गोस्वामी खास विक्रम केला आहे.
झुलन गोस्वामीचा विक्रम
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्विकारत भारताने ५० षटकात सर्वबाद २२१ धावा धावफलाकावर लावल्या. त्यानंतर २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडची सलामीला फलंदाजीसाठी आलेली टॅमी ब्यूमॉन्ट १० धावांवर झुलन गोस्वामीच्या गोलंदाजीचा सामना करताना त्रिफळाचीत झाली.
त्यामुळे भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. वनडे सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना झुलनने १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ब्यूमॉन्टला बाद करताच हा विक्रम तिने आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे झुलन वनडे सामन्याच्या दुसऱ्या डावात १०० विकेट्स घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.
महिला वनडे सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झुलन पाठोपाठ कॅथरिन फिट्झपॅट्रिक असून तिने दुसऱ्या डावात ९८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर एलिसा पेरी (९१), सना मीर (८५) आणि अनिसा मोहम्मद (८२) यांचा क्रमांक लागतो. (Jhulan Goswami has become the first ever woman to take 100 second innings wickets in ODIs)
भारताचा पराभव
दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने ५९ धावांची खेळी केली. तसेच शेफाली वर्माने ४४ धावा केल्या. याव्यतिरिक्त भारताच्या प्रमुख फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळे भारताला २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून केट क्रॉसने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतरही त्यांनी पहिल्या ५ विकेट्स नियमित कालांतराने गमावल्या. मात्र, त्यानंतर सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सोफिया डंकलीने फलंदाजीची जबाबदारी घेत कॅथरिन ब्रंटला साथीला घेतले. या दोघींनी ११२ चेंडूत नाबाद ९२ धावांची सहाव्या विकेटसाठी विजयी भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडने ४७.३ षटकात २२५ धावा करत हा सामना सहज जिंकला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली.
भारताकडून गोलंदाजीत पुनम यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच झुलन गोस्वामी, शिखा पांडे आणि स्नेह राणाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
झुलन गोस्वामीची वनडे कारकिर्द
झुलनने वनडे क्रिकेटमध्ये २००२ साली पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत १८८ वनडे सामने खेळले असून यात तिने २१.४२ च्या सरासरीने २३५ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये तिने २ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. ती महिला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. विशेष म्हणजे तिच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही महिला क्रिकेटपटूला २०० पेक्षा अधिक विकेट्स वनडेत घेता आलेल्या नाहीत. झुलनने टी२० क्रिकेटमधून काहीवर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन दशकांपूर्वी रॉबिन सिंगने केलेला ‘हा’ विक्रम अजूनही अबाधित, आता भुवीकडे पराक्रम करण्याची संधी
मिताली राजची एकाकी झुंज पुन्हा अपयशी; इंग्लंड महिलांनी दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिकाही टाकली खिशात