वय ही केवळ संख्या असते, हे सिद्ध करत जोआना चाइल्ड हिने वयाच्या 64व्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिनं पोर्तुगालकडून नॉर्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वयोवृद्ध महिला खेळाडू म्हणून नाव नोंदवलं.
या सामन्यात तिनं 8 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या. पोर्तुगालने हा सामना 16 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात तिने केवळ 4 चेंडू टाकले आणि 11 धावा दिल्या, मात्र पोर्तुगालला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत पोर्तुगालने ही मालिका 2-1 ने जिंकली.
जोआना चाइल्ड ही उजव्या हाताची फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असून, तिचं खेळावरचं प्रेम आणि समर्पण संघात विशेष ठरलं. तिच्या संघात 15 वर्षीय ईश्रित चीमा तसेच 16 वर्षीय मरियम वसीम आणि अफशीन अहमद यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे अनुभव आणि तरुणाई यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
🚨 64-YEAR OLD JOANNA CHILD MADE HER T20I DEBUT FOR PORTUGAL. 🚨 pic.twitter.com/lF3AZIvzdq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
64 वर्षे आणि 183 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणाऱ्या चाइल्ड ही टी20 महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वयोवृद्ध पदार्पण करणाऱ्या खेळाडू ठरली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर जिब्राल्टरच्या सॅली बार्टन आहे. ज्यांनी डिसेंबर 2024 मध्ये 67 वर्षे 206 दिवस वयाने पदार्पण केलं होतं.