लॉर्ड्सवर लाजिरवाण्या पराभवाचा सामना केल्यानंतर इंग्लंड संघ तिसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. मात्र, 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथील तिसऱ्या कसोटीच्या अगोदर इंग्लिश संघाला मार्क वुडच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज वुड या महत्त्वाच्या कसोटीला मुकणार आहे. अशा परिस्थितीत, प्लेइंग इलेव्हनबाबत कर्णधार जो रूटसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
डॉमिनिक सिबलीच्या जागी डेवीड मलानचा संघात समावेश करण्यात आला आहे; तर तिसऱ्या कसोटीसाठी साकीब महमूदचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, इंग्लंडच्या कर्णधाराने हेही सूचित केले आहे की, इंग्लंड तिसऱ्या कसोटीत डेवीड मलान आणि साकिब महमूद यांच्यासह मैदानात उतरू शकतो.
पत्रकार परिषदेत बोलताना जो रूट म्हणाला, “डेवीड मलान पहिल्या तीन फलंदाजांमध्ये नक्कीच खूप अनुभवी आहे. फक्त कसोटी क्रिकेटच नाही, तर त्याने बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याला दबावात कसे खेळावे हे चांगले ठाऊक आहे.”
वुडच्या संघाबाहेर जाण्याबद्दलही तो म्हणाला, “मला वाटते की साकिब कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी अधिक चांगल्या पर्याय असेल, तुम्ही पाहिले असेल की, त्याने गेल्या काही वर्षांमध्ये सर्व प्रकारांमध्ये कशी चांगली प्रगती केली आहे.” साकीबने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला खेळण्याची सर्वाधिक संधी असेल.
रूट पहिल्या कसोटी सामन्यापासून आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करत आहे. पण त्याचे संघ सहकारी त्याला पुरेपुर साथ देताना दिसले नाहीत. तरीही कर्णधाराला विश्वास आहे की, त्याचे उर्वरित फलंदाज लवकरच फॉर्ममध्ये परततील.
असा विश्वास व्यक्त करत तो पुढे म्हणाला, “मोठी भागीदारी करणे ही कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट असते. जेव्हा दोन फलंदाज बराच काळ एकत्र खेळपट्टीवर टिकून राहतात, तेव्हा संघाच्या धावफलकाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसू शकते. उत्कृष्ट फलंदाजी असलेल्या संघाचे हे मोठे वैशिष्ट्य असते. आपण यावर काम केले पाहिजे. भारतीय संघाकडे उत्कृष्ट गोलंदाजी विभाग आहे. अगदी आपण जर कसोटी क्रिकेट बघितले तरी त्यांच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी इंग्लंडमधील परिस्थितीला अनुकूल आहे किंवा त्यांनी या परिस्थितीशी खूप जुळवून घेतले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या मार्गावर, तोडू शकतो कपिल देव यांचा ‘मोठा’ रेकॉर्ड
धोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात