लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा टेस्ट आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 251 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या सलामीवीरांची फारशी चमकदार कामगिरी झाली नाही. बेन डकेटने 23 तर जॅक क्रॉलीने 18 धावा केल्या आणि दोघेही एका ओव्हरमध्येच बाद झाले. ही विकेट्स भारताच्या नितीशकुमार रेड्डीने 14व्या षटकात घेतल्या आणि इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.
त्यानंतर ऑली पोपने क्रीजवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या अर्धशतकापासून 6 धावा कमी पडल्या. त्यानंतर काही वेळातच हॅरी ब्रूक देखील 11 धावा काढून बुमराहचा बळी ठरला. येथून जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी जबाबदारी स्वीकारली आणि 5व्या विकेटसाठी 79 धावांची शानदार भागीदारी केली.
दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, जो रूटला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 37 वे शतक झळकावण्याची उत्तम संधी होती पण तो तसे करू शकला नाही. आता त्याला शतक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागेल. दुसऱ्या दिवशी एक धाव घेताच रूट त्याचे शतक पूर्ण करेल. सध्या तो 99 धावांवर नाबाद आहे.
जो रूटने 156 कसोटी सामन्यांच्या 284 डावांमध्ये 36 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत. त्याच्या खात्यात एक धाव भरताच, रूट कसोटी क्रिकेटमध्ये 37 शतके झळकावेल आणि स्टीव्ह स्मिथला मागे टाकून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा पाचवा फलंदाज बनेल. सध्या, रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याकडे प्रत्येकी 36 शतके आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – 51
जॅक कॅलिस – 45
रिकी पॉन्टिंग – 41
कुमार संगकारा – 38
स्टीव्ह स्मिथ – 36
जो रूट – 36
जो रूटने कसोटीत 36 शतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने 18 शतके झळकावली आहेत. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे एकूण 54 शतके आहेत. आता, आणखी एका शतकासह, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाची बरोबरी करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 100 शतके झळकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
सचिन तेंडुलकर – 100
विराट कोहली – 82
रिकी पॉन्टिंग – 71
कुमार संगकारा – 63
जॅक कॅलिस – 62
हाशिम अमला – 55
जो रूट – 54
महेला जयवर्धने – 54






