सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे खेळतोय. मात्र, त्याच वेळी इंग्लंड संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे पुढील जवळपास सहा महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघाच्या टी२० विश्वचषक व ऍशेस मालिकेच्या रणनितींना जबर धक्का बसला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) याबाबतची अधिकृत माहिती दिली.
दुखापतीने खाल्ली उचल
चालू वर्षी मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर असताना आर्चरला कोपराची दुखापत झाली होती. त्यानंतर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेर होता. आयपीएल तसेच सध्या चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली होती. आर्चर या दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर आलेली. मात्र, मागील आठवड्यात केलेल्या स्कॅनमधून स्पष्ट झाले की, त्याची ही दुखापत बरी होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.
याबाबत बोलताना ईसीबीने म्हटले, “जोफ्रा आर्चरची कोपराची दुखापत पुन्हा चिघळली आहे. त्यामुळे तो सध्या सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत, आयपीएल २०२१मध्ये, टी२० विश्वचषकात व ऍशेस मालिकेत खेळताना दिसणार नाही.”
इंग्लंडचा हुकमी एक्का आहे आर्चर
मूळ वेस्ट इंडिजचा असलेला आर्चर इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याला २०१९ वनडे विश्वचषकाच्या इंग्लंड संघात समाविष्ट करण्यासाठी ईसीबीने आपले नियम बदलले होते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हर टाकत त्याने इंग्लंडला प्रथमच विश्वविजेता बनण्याचा मान मिळवून दिला होता.
आगामी टी२० विश्वचषकात इंग्लंड संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तसेच, ऑस्ट्रेलियातील ऍशेस मालिकेत आर्चर इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाज म्हणून पुढे आला असता. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
कारकीर्द येऊ शकते धोक्यात
सध्या केवळ २६ वर्षाचा असलेला आर्चर आत्तापर्यंत १३ कसोटी, १७ वनडे व १२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे ४२, ३० व १४ बळी मिळवले आहेत. सततच्या दुखापतीमुळे तो अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांना मुकतो. २०२० आयपीएलमधील तो सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावतो अँडरसन, ‘या’ दिग्गजांना दाखवलाय सर्वाधिक वेळा तंबूचा मार्ग
एक ‘गोल्डन डक’ अन् कर्णधार म्हणून विराटच्या नावे नकोसा विक्रम
भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता