भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या सामन्याचा नायक ठरला. विजयानंतर आर्चरने प्रतिक्रिया देताना, इंग्लंड संघाची रणनीती सांगितली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले आणि यजमानांनी श्रेयस अय्यर (६७) च्या अर्धशतकाच्या मदतीने ७ बाद १२४ धावा केल्या. इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग करताना १५.३ षटकांत २ गडी गमावत आरामात १२५ धावांचे आव्हान पार केले. इंग्लंडने हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. तीन बळी मिळवणाऱ्या जोफ्रा आर्चरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आर्चरने सांगितली इंग्लंडची रणनीती
भारताचे तीन फलंदाज बाद करणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आर्चर म्हणाला, “खेळपट्टी संथ होती. त्यामुळे, लेन्थ बॉलिंग करता येत नव्हती. अशा खेळपट्टीवर तुम्ही फुल लेन्थ गोलंदाजी करता तेव्हा, फलंदाजांना फटके खेळण्यास सोपे जाते. मात्र, आम्हाला आमच्या योजनेत बदल करावा लागला नाही.”
इंग्लंड संघाच्या रणनितीविषयी सांगताना तो म्हणाला, “पॉवर प्लेमध्ये केवळ राहुलच नाहीतर प्रत्येक फलंदाजाबाबत आमच्याकडे योजना होती. आम्ही शक्य तितकी सरळ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यष्ट्यांच्यामागे फटके मारलेले गोलंदाजांसाठी आनंददायी असते. मात्र, समोरच्या बाजूने चौकार-षटकार गेल्यास गोलंदाज म्हणून वाईट वाटते.”
पहिल्या सामन्यात आर्चरने दुसऱ्याच षटकात भारताचा सलामीवीर केएल राहुलला त्रिफळाचीत केले. तर, १७ व्या षटकात जम बसलेल्या श्रेयस अय्यरला आणि शार्दुल ठाकुरला त्याने लागोपाठच्या चेंडूवर बाद करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्याने आपल्या चार षटकांत २३ धावा देत ३ बळी मिळवत सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० मालिका: पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कशी असेल भारताची रणनिती? अय्यरने केला उलगडा
INDvENG : दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो ‘हा’ बदल, पाहा संभावित ११ जणांचा संघ
‘रोहित नसेल तर मी सामना पाहणार नाही’, सेहवागचे पहिल्या टी२० सामन्यानंतर मोठे वक्तव्य