क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्मा याने शुक्रवारी (दि. 3 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. जोगिंदरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, जोगिंदर शर्मा हा 2007च्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. त्याने ट्वीट करत म्हटले की, “मी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद.”
https://twitter.com/mjogindersharma/status/1621393735807549442?s=46&t=mMTaECpuS-zPRM3LNmTlag
जोगिंदर शर्मा याने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच नाही, तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या ट्वीटमध्ये निवृत्तीबाबत माहिती देत लिहिले आहे की, “आज, अत्यंत कृतज्ञता आणि विनम्रतेने, मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून माझ्या निवृत्तीची घोषणा करतो. 2002-2017 चा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे आहे. खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा हा सन्मान होता. मला मिळालेल्या संधीबद्दल मी भारतीय क्रिकेट संघ (बीसीसीआय), हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचा आभारी आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफसाठी- आपल्या सर्वांबरोबर खेळण्याचा पूर्ण विशेषाधिकार मिळाला. तसेच, मी माझे स्वप्न सत्यात उतरवू शकलो, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.”
यावेळी त्याने चाहत्यांचेही आभार मानले. तो म्हणाला की, “माझ्या सर्व क्रिकेट चाहत्यांनाही धन्यवाद, ज्यांनी मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेल्या चढ-उतारांच्या वेळी पाठिंबा दिला आहे. मी तुमच्यासोबत घालवलेला क्षण कायम आठवणीत राहील. तुमचा पाठिंबा हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. शेवटी, मी माझे कुटुंब आणि मित्र त्यांचे बिनशर्त आभार मानू इच्छितो, ज्यांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला प्रेम आणि समर्थन दिले. ते माझा आधार आहेत आणि त्यांच्याशिवाय मी आज माझ्याकडे जे आहे, ते मी मिळवू शकलो नसतो. मी या क्षेत्रात नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. एक क्रिकेटपटू म्हणून माझ्या प्रवासाची पुढची पायरी आहे आणि मी माझ्या या नवीन अध्यायाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी माझ्या सर्व माजी खेळाडूंना आणि भारतीय क्रिकेट संघाला भावी कामगिरीसाठी शुभेच्छा देतो.”
विशेष म्हणजे, 2007साली जोगिंदरच्या विश्वचषकातील प्रदर्शनामुळे त्याला हरियाणा सरकारने डीएसपीपदी नियुक्त केले होते. जोगिंदरने भारताकडून 4 वनडे आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान वनडेत 1, तर टी20त 4 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 35 धावा केल्या होत्या, तर टी20त त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. (joginder sharma Announced retirement from cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! रोहित ज्याच्या कॅप्टन्सीखाली खेळला, त्याची 71 लाखांची फसवणूक; कुटुंबासह जीवे मारण्याचीही धमकी
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात नाकी नऊ आणणारे जबरदस्त गोलंदाज, यादीत ‘हा’ एकमेव भारतीय






