टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र, या सामन्यादरम्यान दोन वर्षांपूर्वी झालेल्या २०१९ वनडे विश्वचषकातील एका सामन्याची पुनरावृत्ती झाली.
अशी घडली घटना
इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे आव्हान पार करताना न्यूझीलंड संघ काहीसा संथ फलंदाजी करत होता. मात्र, ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या सतराव्या षटकात सामन्याचे चित्र पालटले. या षटकातील पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडच्या जिमी निशामने उंचावरून फटका खेळला. मात्र, हा चेंडू हवे तितके अंतर कापू शकला नाही व इंग्लंडचा क्षेत्ररक्षक जॉनी बेअरस्टोने सीमारेषेवर झेप टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, झेल पकडताना त्याचा पाय सीमारेषेला लागल्यामुळे पंचांनी षटकार दिला. इथून पुढे खर्याअर्थाने सामन्याचे चित्र पालटले व न्यूझीलंडने सामना खिशात घातला.
दोन वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटना
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी अटीतटीच्या क्षणी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने मारलेला फटका अशाच रीतीने अडवण्याच्या प्रयत्नात ट्रेंट बोल्टचा पाय सीमारेषेला लागून षटकार इंग्लंडच्या खात्यात जमा झाला होता. पुढे, इंग्लंड सुपर ओवरमध्ये पोहोचलेल्या या सामन्यात विजय मिळवून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
Johnny Bairstow did a Trent Boult and thats where the tables turned.#ENGvsNZ pic.twitter.com/Z1GcE52Vqf
— Yahya (@KyaaBatHai) November 10, 2021
न्यूझीलंडचा पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश
अबुधाबी येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर १६६ धावा बनविल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेरिल मिचेलने नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला विजय प्राप्त करून दिला. अष्टपैलू जिमी निशामने ११ चेंडूत २७ धावा काढून विजयात निर्णायक भूमिका बजावली. गुरुवारी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजेता अंतिम सामन्यात त्यांच्याशी भिडेल.