मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्टइंडीजचा संघ या मालिकेसाठी मागील आठवड्यात एका विशेष विमानाने इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ देखील या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे.
या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने 55 संभावित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या संघात धडाकेबाज 30 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो यांची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याला संधी देण्यात आली नव्हती. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात त्याला फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने दोन्ही डावांत मिळून दहा धावा केल्या. त्यानंतर त्याला पुन्हा संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याच्या ऐवजी जॉस बटलर यांची वर्णी लागली.
सध्या इंग्लंडच्या संघात यष्टीरक्षकांची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेवर मात करत जॉनी बेअरस्टो संघात पुनरागमन केले. एका संकेतस्थळाशी बोलताना बेअरस्टो म्हणाला, “मी माझ्या फलंदाजीवर खूपच मेहनत घेतली असून त्यात अनेक बदल झाले आहेत. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी माझ्यावर टीका केली होती. त्या टीका आता बंद झाले आहेत.
तो म्हणाला, “यष्टिरक्षक म्हणून माझी कामगिरी चांगली आहे. माझे आकडेही चांगले आहेत. मागील काही सामन्यात माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. मी बॉलिंग मशीनच्या साहय़ाने फलंदाजीचा सराव केला आहे. फलंदाजीच्या तंत्रात देखील सुधारणा होत आहे. ”
जॉनी बेअरस्टोने 70 कसोटी सामन्यांत 34.74 च्या सरासरीने 4030 धावा केल्या आहेत. तर 76 वनडे सामन्यात 47.15 च्या सरासरीने 2923 धावा केल्या आहेत. 37 टी 20 सामन्यात 139. 42 च्या सरासरीने 725 धावा जमविल्या आहेत. यामध्ये कसोटीत 6 तर वनडेमध्ये 9 शतकांचा समावेश आहे.