ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार, असे अनेक जणांनी म्हटले आहे.
यादरम्यानच इंग्लंडचा यष्टीरक्षक खेळाडू जॉस बटलरची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याच्या मते भारताविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागेल.
एका ऑनलाईन मुलाखतीत बटलर म्हणाला, “आम्हाला भारतातील परिस्थितीशी जुळवून उत्तम खेळ करावा लागेल. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये पहिल्या डावात 300 धावा मोठ्या समजल्या जातात. पण जेव्हा तुम्ही भारतात खेळतात तेव्हा पहिले दोन दिवस हे फलंदाजीसाठी अनुकूल असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला सामना जिंकण्यासाठी 600 ते 650 धावा कराव्या लागतात.”
या मुलाखतीत बटलरने जो रुटचे कौतुक केले असून, इतर खेळाडूंनी त्याच्याकडून शिकावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
बटलर म्हणाला,” मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जो रुट आम्हा सर्वांसाठी एक उदाहरण आहे. रूटने श्रीलंकेमध्ये द्विशतक झळकावले तसेच 180 धावांची खेळी देखील केली. त्याने आपल्या खेळातून दाखवून दिले की परिस्थितीचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारावी लागेल.”
बटलरने 2016 मालिकेच्या आठवणी सांगताना पहिल्या डावाचे महत्व उलगडले आहे. बटलर म्हणाला, “आम्ही 4-5 वर्षांपूर्वी चेन्नई येथे खेळलो होतो. त्यावेळी आम्ही पहिल्या डावात 470 धावा बनवल्या होत्या. प्रतिउत्तरात भारतीय संघाने करुण नायरच्या त्रिशतकाच्या बळावर 700 धावा बनवल्या होत्या. यावरून स्पष्ट होते की भारतात पहिल्या डावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
आगामी काळात इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर; भारतातच होणार आयपीएल २०२१ चे आयोजन ?
कोण जिंकणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? अंतिम चुरशीसाठी आज तमिळनाडू आणि बडोदा आमने-सामने






