इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना रविवारी (२ मे) डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला होता. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात जोस बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने एकहाती विजय मिळवला होता. तसेच सामना झाल्यानंतर त्याने माजी इंग्लिश कर्णधार ॲलेस्टर कुकची आठवण काढली आहे.
राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जोस बटलरने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर वादळी खेळी केली होती. त्याने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ८ लांबच लांब षटकार मारले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ५५ धावांनी विजय मिळवला होता. तसेच शतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला, “ॲलेस्टर कुक नेहमीच माझी खिल्ली उडवत असतात की, टी-२० मध्ये त्यांच्या नावावर माझ्यापेक्षा एक शतक जास्त आहे. मी माझ्या कारकिर्दीत अधिकतर मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. त्यामुळे शतक झळकावने थोडे कठीण जाते. परंतु वरच्या फळीत फलंदाजी करणे एक चांगली संधी असते. आता मी ॲलेस्टर कुकची बोलती बंद करणार, जे नेहमी मला बोलतात की, त्यांच्या नावावर माझ्यापेक्षा टी-२० मध्ये माझ्यापेक्षा एक जास्त शतक आहे.”
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये जोस बटलरने महत्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. तसेच कर्णधार संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघातील मुख्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली होती. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या होत्या. इतर खेळाडूंना मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते.
या सामन्यातील विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत ६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर हैदराबाद संघ २ गुणांसह ८ व्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल ब्रेकिंग! आज होणारा केकेआर विरुद्ध आरसीबी सामना पुढे ढकलला, वाचा कारण