पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३२९ धावा ठोकल्या. भारतीय डावात यष्टीरक्षक रिषभ पंतने आक्रमक अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला बाद करताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
रिषभची तुफानी खेळी
अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्याने पुन्हा एकदा नैसर्गिक फटकेबाजीचा नजराणा सादर करत ६२ चेंडूत ५ चौकार व ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च ७८ धावा ठोकल्या. भारतीय संघाची चार बाद १५७ अशी स्थिती असताना त्याने हार्दिक पंड्यासोबत ७० चेंडूत ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
बटलरचा नेत्रदीपक झेल
रिषभ पंत आपल्या पहिल्यावहिल्या वनडे शतकाकडे वेगाने आगेकूच करत होता. डावाच्या ३५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गोलंदाज सॅम करनने खोल टप्प्याचा चेंडू टाकला. पंतने हा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन यष्ट्यांमागे गेला.
इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि कर्णधार जोस बटलर हा पहिल्यांदा जरासा उजव्या हाताकडे झुकला होता. परंतु, चेंडू डाव्या हाताकडे अत्यंत खालच्या दिशेने आला. त्याने चपळाइने हात मध्ये घालत हा झेल पकडला. पंत लवकर बाद झाल्याने भारतीय संघाने ३०-४० धावा कमी बनविल्या.
https://twitter.com/hormone_doc/status/1376123720402669570
— Cricsphere (@Cricsphere) March 28, 2021
इंग्लंडची खराब सुरुवात
भारतीय संघाने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो हे आपले दोन्ही सलामीवीर झटपट गमावले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने ९ षटकात २ बाद ५१ धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स २६ तर, डेव्हिड मलान ४ धावांवर नाबाद आहेत. भारतासाठी दोन्ही बळी भुवनेश्वर कुमारने मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
हे भारीय! रिषभ पंत आऊट होऊ नये म्हणून इंग्लंडचाच माजी खेळाडू करत होता प्रार्थना
संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय
आयपीएल २०२१: राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी; ‘हा’ गोलंदाज लवकरच होतोय संघात सामील