शारजहाच्या मैदानावर सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. गेल्या २ सामन्यात पराभूत झालेला श्रीलंका संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तर इंग्लंड संघाकडे विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत इंग्लंडच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि श्रीलंका संघावर २६ धावांनी विजय मिळवला. या विजयात जोस बटलरने मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याने फलंदाजी करताना तुफानी शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील त्याने यष्टीमागे अप्रतिम कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजाला माघारी धाडले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
श्रीलंका संघाला या सामन्यात विजयासाठी १६४ धावांची आवश्यकता होती. या धावांचा बचाव करताना, इंग्लंड संघाकडून १८ वे षटक टाकण्यासाठी ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसराच चेंडू ख्रिस जॉर्डनने १४१ च्या गतीने टाकला जो, श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने यष्टिरक्षक जोस बटलरकडे मारला.
दसून शनाकाने चेंडू मारताच चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जोस बटलरने काही सेकंदातच चेंडू उचलला आणि यष्टीला मारला. फलंदाज क्रिझमध्ये पोहचणार इतक्यात तो चेंडू अचूकपणे यष्टीला लागला, ज्यामुळे फलंदाजाला माघारी परतावे लागले.
या सामन्यात शतक झळकावणाऱ्या जोस बटलरच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. तो इंग्लंड संघासाठी तीनही स्वरूपात शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यासह तो तीनही स्वरूपात २००० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव १३७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने २६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मासह ‘हे’ ५ खेळाडू ठरले खेलरत्न पुरस्काराचे मानकरी; ईशांत, दिप्तीलाही अर्जुन पुरस्कार
टी२० विश्वचषकात बटलरचे खणखणीत शतक, सामन्यानंतर सांगितले आपल्या ‘विक्रमी’ खेळीमागचे रहस्य
जॉस द बॉस; श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत ‘या’ विक्रमात बनला इंग्लंडचा नंबर १ सलामीवीर





