ऑस्ट्रेलियन संघाचा फलदांज स्टीव्ह स्मिथ याच्यावर २०१८ मध्ये केलेल्या बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे १ वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. यासोबतच त्याला २ वर्षांसाठी कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
स्टीव्ह स्मिथने तब्बल तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत बोलताना जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे की,” माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्या तरी देखील ऑस्ट्रेलियन संघात कर्णधारपदासाठी कुठलेही स्थान रिकामे नाहीये. येणाऱ्या २ मोठ्या स्पर्धांसाठी २ कर्णधार आहेत. यात ॲशेस आणि टी -२० विश्वचषक सारख्या स्पर्धा आहेत. आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत व आमचे भविष्य उज्ज्वल आहे.”
ऑस्ट्रेलियन संघाला गेल्या काही महिन्यांमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मर्यादित षटकांची धुरा ऍरॉन फिंचच्या हाती आहे. तर कसोटी सामन्यांची धुरा टीम पेनच्या हाती आहे. टीम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या सलग २ कसोटी मालिका गमावल्या आहेत. यासोबतच फिंचला देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. अशातच स्मिथने कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामुळे चर्चांना उधाण आले होते परंतू आता खुद्द प्रशिक्षकांनी समोर येत ही चर्चा संपवली आहे.
काय म्हणाला होता स्टीव्ह स्मिथ
“याबद्दल विचार करण्यास माझ्याकडे बराच वेळ होता, परंतु मला असे वाटते की आता मी अशा एका टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारण्यास आवडेल. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला योग्य वाटत असेल आणि यात ऑस्ट्रेलियन संघाचे हित असेल तर मी ही जबाबदारी स्वीकारण्यास नक्कीच तयार आहे.”
स्टीव्ह स्मिथची कर्णधार म्हणून कामगिरी
स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियन संघासाठी एकूण ३४ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. यात त्याला १८ सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. तसेच त्याला ५१ वनडे सामन्यात २५ सामने जिंकवून देण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला ४ सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
हेही वाचा-
–जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट
–क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! चार एप्रिल रोजी बांगलादेशात होणार भारत-पाकिस्तान संघात क्रिकेटचा थरार
–व्हिडिओ : आला रे आला बुमबुम आला! बुमराह मुंबईच्या ताफ्यात दाखल