---Advertisement---

महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..

On: गुरूवार, जून 28, 2018 4:40 PM
---Advertisement---

-अनिल भोईर

कबड्डी आणि महाराष्ट्र खूप जुनं नातं आहे. मराठमोळ्या मातीशी जोडलेला कबड्डी खेळ आता मातीवरून मॅटवर खेळला जाऊ लागला आहे. कबड्डी म्हटलं की पूर्वी भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा असायचा. महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा होता.

महाराष्ट्राच्या कबड्डीने भारताला अशोक शिंदे, शांताराम जाधव, पंकज शिरसाट, शैलेश सावंत आणि राजू भावसारांसारखे अनेक खेळाडू दिले. पण आज याच महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्या संधीचे सोनं केले आहे. महाराष्ट्रामध्ये कबड्डीचे हजारो खेळाडू आहेत. त्यामध्ये प्रो कबड्डीत व राष्ट्रीय पातळीवर खेळणारेही अनेक खेळाडू आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये चिकाटी व कौशल्य खूप आहे फक्त ते एका संधीची वाट बघत आहेत.

दोन वर्षांपूर्वी अहमदाबादला ऑक्टोबर २०१६ मध्ये कबड्डी विश्वचषक पार पडला. तेव्हा भारतीय संघाच्या निवड शिबिरात महाराष्ट्राचे खेळाडू होते पण विश्वचषकात भारतीय संघात महाराष्ट्राच्या एकही खेळाडूला संधी मिळाली नाही.

इराण येथे नोव्हेंबर २०१७ मध्ये आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप झाली त्यावेळी पण भारतीय संघात महाराष्ट्राचे खेळाडू नव्हते.

हैद्राबाद येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावत सर्वांना महाराष्ट्र कबड्डीची ताकद पुन्हा नव्याने दाखवून दिली. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आम्ही पण तयार आहोत हे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दाखवले.

दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स या अांतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवडिगा व गिरीश इरनाक या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आली. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत दमदार खेळ करत भारतीय संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलत आहेत.

भारतीय संघात पहिल्यादांच मिळालेल्या संधीचे दोन्ही खेळाडूंनी सोनं केलं. कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून सेमीफायनल व फायनलचे सामने बाकी आहेत.

रिशांक देवडीगाला तीन सामन्यात संधी मिळाली. त्यामध्ये चढाईत २३ गुण मिळवले. तर काही पकडी देखील केल्या आहेत. केनिया विरुद्धच्या सामन्यात रिशांकने सुपरटेन करत कबड्डी मास्टर्स स्पर्धेत सुपरटेन करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्या सामन्यात रिशांकने १३ गुण मिळवले. त्यामध्ये एका सुपररेडचा समावेश होता.

महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू गिरीश इरनाकलादेखील तीन सामन्यात खेळायची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने ९ पकडी केल्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गिरिशने पाच पकडी करून स्पर्धेत भारताकडून हाय फाय करणारा पहिला खेळाडू बनला.

https://twitter.com/hotstartweets/status/1011286810335408129

महाराष्ट्राच्या खेळाडूना याच संधीची गरज आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही खेळाडूंनी मिळाल्या संधीचे सोनं करत कबड्डी मास्टर्स स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने सलग चार सामने जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

टी२०मध्ये ६ हजार धावा करणारा शिखर धवन ६वा भारतीय

-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही

-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment