कबड्डी दुबई मास्टर्स 2018 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताच्या खेळाडूंनी रेडींग आणि डिफेन्स दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत पाकिस्तान विरुद्ध 41-17 असा सहज विजय मिळवला. भारताच्या विजयात कर्णधार अजय ठाकूर, मोनू गोयात आणि रोहित कुमारने रेडींगमध्ये तर गिरिश एर्नाकने डिफेंन्समध्ये गुण मिळवत मोलाचा वाटा उचलला.
पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला असला तरी जर त्यांनी पुढील सामन्यात केनियाला पराभूत केले तर त्यांनाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.
रोहित कुमारने तिसऱ्या मिनिटाला भारताचे खाते उघडले होते. पण चौथ्याच मिनिटाला पाकिस्तानचा रेडर मुहम्मद नदीमने पाकिस्तानला एक गुण मिळवून दिला. त्यांनतर पुन्हा एकदा पाचव्या मिनिटला कर्णधार अजय ठाकुरने गुण मिळवत भारताला आघाडी मिळवून दिली.
यानंतर मात्र भारतीय संघाने ही आघाडी वाढवत नेली. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी 18-9 पर्यंत वाढवली. त्यानंतर रिशांक देवाडिगाने 21 व्या मिनिटाला दोन गुण मिळवत ही आघाडी 20-11 अशी केली.
यानंतरही भारताचा कर्णधार अजय ठाकूर, मोनू गोयात यांनी आक्रमण कायम ठेवले. भारताच्या रेडर्सला रोखण्यात पाकिस्तानच्या डिफेंडर्सला अपयश येत होते. तर भारताच्या डिफेंडर्समध्ये गिरिश एर्नाकने 5 टॅकल पॉइंट मिळवत पाकिस्तानला गुण घेण्यापासुन रोखले होते. अखेर भारताने पाकिस्तानला एकही संधी न देता 41-17 असा सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या:
–चौथ्या कबड्डी विश्वचषकाचे यजमानपद भारताला नाही तर या देशाला मिळणार!
–महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन








