---Advertisement---

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा: युवा पलटन, मुंबई पोस्टलसह 11 संघ बाद फेरीत

On: गुरूवार, एप्रिल 16, 2026 2:40 PM
---Advertisement---

युवा पलटन, मुंबई पोस्टल, भारत पेट्रोलियम, सीजीएसटि मुंबई बंदर, डीपीयु पुणे, मिड लाईन, मध्य रेल्वे, एचएएल नाशिक, मीरा भाईंदर महानगर पालिका, युनियन बँक आणि ठाणे महानगर पालिका यांनी ओम् ज्ञानदीप मंडळाने आयोजित केलेल्या या हंगामातील पहिल्या पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली.

मुंबई, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅट वर झालेल्या फ गटातील साखळी सामन्यात रायगडच्या मिड लाईन अकादमीने बलाढ्य अशा मध्य रेल्वे संघावर ४९-२० अशी सहज मात केली. झंझावाती सुरूवात करणाऱ्या मिड लाईनने पूर्वार्धातच ३ लोण देत ३५-१२ अशी मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धीरज बैलमारेच्या तुफानी चढाया त्याला आदर्श कुमारची मिळालेली पकडीची साथ यामुळे त्यांनी २९ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. रेल्वेच्या शुभम शिंदे, आशिष कुमारचा खेळ या सामन्यात बहारला नाही, मात्र गट उपविजेते म्हणून रेल्वेने देखील बाद फेरी गाठली.

मीरा भाईंदर महानगर पालिकेने प. डावातील १५-१९ अशा पिछाडीवरून जे. जे. रुग्णालयाचा प्रतिकार ४१-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. दोन पराभवामुळे जे. जे. ला साखळीत गारद व्हावे लागले. जे. जे. च्या रिहान शेख, ओमकार दारकुडे यांनी संघाला आधाडी दिली होती. नंतर मात्र ते ढेपाळले. त्यांनी प. डावात ३ तर नंतर एक अव्वल पकड करीत संघाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. दुसऱ्या डावात मीरा भाईंदरच्या संकेत खाताते, संदीप गुरव टॉप गिअर टाकत संघाला बाद फेरी गाठून दिली.

युनियन बँकेने फ गटात प्रथम हिंदुजा रुग्णालयाला ४५-२६ असे पराभूत करीत बाद फेरीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. नंतर ठाणे महानगर पालिके बरोबर १४-१४ असा बरोबरीत सामना सोडवित बाद फेरी गाठली. अतुल जाधव, अक्षय तावडे यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. क गटात मुंबई बंदरने आणि पुण्याच्या डी. पी. यु. संघात ३८-३८ अशी बरोबरी झाली. मध्यंतरला देखील १७-१७ अशी बरोबरी होती. तेजस टक्के, सौरभ राऊत मुंबई बंदर कडून, तर विकास जाधव, सुमित घोलप डी. पी. यु. कडून उत्कृष्ट खेळले.

भारत पेट्रोलियमने ब गटात सीजीएसटिला ४४-४० असे चीत करीत गटविजेते म्हणून बाद फेरी गाठली. सीजीएसटि या गटात उपविजेते ठरले. पूर्वार्धात एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या भारत पेट्रोलियमने ही किमया केली. योगेश दहीया, राजकमल कुमार यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. सीजीएसटिच्या शंकर गदई, आशिष बदाडे यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी पडला. युवा पलटनने अ गटात मुंबई पोस्टलला ३२-३१ असे चकवीत गटविजेते पद मिळविले. मुंबई पोस्टल उपविजेते ठरले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---