मागील अनेक महिन्यांपासून अन्य खेळांप्रमाणे कबड्डीचे सामने देखील स्थगित झाले होते. पण आता बाकी खेळांप्रमाणेच कबड्डीचे देखील पुनरागमन होत आहे. भारतातील हरियाणा राज्यातील महेंद्रगढ जिल्ह्याच्या मेघनवास गावात विशाल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन गावातील लोकांच्या मदतीने करण्यात येत आहे.
ही स्पर्धा १४ आणि १५ ऑक्टोबरला सुरु होत आहे. याबद्दल गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा कर्णधार सुनील मलिकने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत माहिती दिली आहे. या स्पर्धेदरम्यान प्रो कबड्डीमधील परवेश भैन्सवाल, सुरेंदर नाडा, विकाश कंडोला, पवन कुमार हे स्टार कबड्डीपटूदेखील उपस्थिती दर्शवतील.
या स्पर्धेतील विजेत्या संघासाठी ८१ हजार रुपयांचे बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या संघासाठी ५१ हजार रुपये बक्षीस रक्कम असणार आहे. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क ११०० रुपये आहे.