दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात शनिवार रोजी (२९ ऑक्टोबर) शारजाह येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा २५ वा सामना झाला. श्रीलंका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने १९.५ षटकात ६ विकेट्स गमावून त्यांचे आव्हान पूर्ण केले आणि ४ विकेट्सने हा सामना जिंकला. या सामना विजयात दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा खास योगदान देऊ शकला नाही. परंतु त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाद्वारे संघाच्या विजयात हातभार लावला.
या सामन्यादरम्यान त्याने श्रीलंकेच्या कर्णधाराचा अप्रतिम झेल टिपला. याबरोबरच एका फलंदाजाला धावबाद करत सर्वांना भुवया उंचावण्यास भाग पाडले.
त्याचे झाले असे की, श्रीलंकेच्या डावातील नववे षटक सुरू होते. या षटकातील पाचव्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलांका याने लेग साइडच्या दिशेने साधारण शॉट खेळला. आपण मारलेला चेंडू दूरवर जात असल्याचे पाहून तो त्वरित २ धावा घेण्यासाठी पळाला. यावेळी मिड विकेटच्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला रबाडा चेंडू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून सतर्क झाला. तोपर्यंत इकडे असलांका त्याची दुसरी धावही पूर्ण करेल असे दिसत होते.
इतक्यात सीमारेषेजवळ असलेल्या रबाडाने अचानक चित्त्याच्या वेगाने धाव घेतली, चेंडू पकडला आणि एका हाताने जोरदान थ्रो केला. यावेळी यष्टीमागे यष्टीरक्षणासाठी उभा असलेल्या क्विंटन डॉ कॉकनेही जबरदस्त चपळता दाखवली आणि डोळ्याचे पाते लवण्याच्या आत चेंडू यष्टीला मारला. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला. स्वत: असलांकालाही आपण अशाप्रकारे धावबाद होण्याची अपेक्षा नसावी. आयसीसीने रबाडाच्या या थरारक क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CVpmqaDlxTT/?utm_source=ig_web_button_share_sheet
क्षेत्ररक्षणात बहुमुल्य योगदान देणाऱ्या रबाडाला या सामन्यात गोलंदाजीत मात्र साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने श्रीलंकेच्या डावादरम्यान ३ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा खर्च केल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा विश्वविक्रम, बनला एका वर्षात सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
नामिबियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल अफगानिस्तान, असगर अफगानचा असेल निरोप सामना






