मुंबई ।आधीच नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला.
मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. या गटात मणिपूरच्या तीन खेळाडू होत्या. पण अवघ्या दीड वर्षात आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या सुडौल बांध्याला पीळदार करणाऱया कांची आडवाणीने इतिहास रचला.
श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या या सिंधी कन्येने आपल्या कुटुंबाचा विरोध झुगारत फिटनेसवर केलेल्या मेहनतीला अखेर मिस इंडिया किताबाचे फळ लाभले. विशेष म्हणजे तिने मणिपूरच्या बलाढ्य आणि पीळदार ममता देवी, सरिता देवी आणि जमुना देवीला हरविण्याचा पराक्रम केला.
आता माझे सासरे नाचताहेत…
मी श्रीमंत असल्यामुळे माझे शरीरसौष्ठवप्रेम कुणालाच पचत नव्हते. आधी माझ्या आई-वडिलांना माझे फिटनेस आणि मॉडलिंग विश्वातील वावर आवडत नव्हता.
मी एका मुलीची आई झाल्यानंतर माझ्या आरामाच्या व्यवसायामुळे थोडी अनफिट म्हणजेच जाडी झाली होती. मला माझे वाढते वजन बघवत नव्हते. तेव्हा मी फिटनेसकडे वळली.
तेव्हा मला जाणीव झाले की माझे यात करिअर आहे. मला पॉवरलाफ्टिंग खूप आवडत होते. ते मी माझ्या फिटनेससाठी करत होते. त्याचदरम्यान मला मॉडेलिंगवरही प्रेम जडले.
मी फिजीक स्पोर्टस् प्रकारातही खेळणे सुरू केले, पण माझ्या व्यावसायिक सासऱयांना माझे बिकिनी घालून स्टेजवर वावरणे जराही आवडत नव्हते. तरीही माझे फिजीक स्पोर्टस् प्रकारात खेळणे सुरूच होते.
मी दोन वर्षांपूर्वी शरीरसौष्ठवाची माझी तयारी सुरू केली. जेव्हा माझे कुटुंबिय विरोध करत होते तेव्हा मला फक्त एक व्यक्ती माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे माझा नवरा.
गेल्यावर्षी मी प्रथमच गुरगावच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळली होती आणि चौथी आली होती. आता माझ्या कठोर मेहनतीमुळे मला दुसऱयाच वर्षी मिस इंडियाचा मान मिळवता आला आहे.
या विजेतेपदानंतर माझे सासरे खूप आनंदी झाले आहेत आणि ते नागपूरमध्ये नाचताहेत. त्यांना आता माझा अभिमान वाटू लागला आहे. आता माझ्या घरची परिस्थिती बदलली आहे. त्याचप्रमाणे आपल्या लोकांचीही मानसिकता लवकरच बदलेल, असा विश्वास कांची आडवाणीने विजयानंतर बोलताना व्यक्त केला.
भारत श्री 2018 स्पर्धेचा निकाल
महिला शरीरसौष्ठव – 1. कांची आडवाणी (महाराष्ट्र अ), 2. ममता देवी यमनम (दिल्ली), 3. गीता सैनी (हरयाणा), 4. जमुना देवी (मणिपूर), सरिता देवी (मणिपूर).
महिला स्पोर्टस् मॉडेल – 1. संजू (उत्तर प्रदेश), 2.सोनिया मित्रा (प. बंगाल), 3. अंकिता सिंग (कर्नाटक), 4. स्टेला गोडे (महाराष्ट्र अ), 5. मंजिरी भावसार(महाराष्ट्र अ).