नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३७२ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. दरम्यान, ही मालिका झाल्यानंतर आता न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराने देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात ६२, तर दुसऱ्या डावात १६७ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ३७२ धावांनी आपल्या नावावर केला. हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
या सामन्यानंतर केन विलियमसनने न्यूझीलंड संघाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले की, “भारतीय संघासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे नेहमीच एक आव्हान असते. या सामन्यात एजाज पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली. अभिनंदन एजाज.”
या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एकाच डावात भारताचे सर्व १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. असा कारनामा करणारा तो आतापर्यंतचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनीच केला आहे. त्याने केलेल्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचा डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला होता, तर दुसऱ्या डावात त्याने ४ गडी बाद केले होते.
भारतीय संघाचा ३७२ धावांनी विजय
भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला ५४० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली, तर हेनरी निकोलसने ४४ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करत आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १६७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ३७२ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”
“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक