मुंबई, दि. ६(क्री.प्र.)- शिवसेना पुरस्कृत ६१ व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शिवसेना सचिव युवानेते सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील दमदार आणि जोरदार शेकडो शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हरमीत सिंग, उमेश गुप्ता, संतोष भरणकर, गणेश बनकर, उदय देवरे, उबेद पटेल , संदेश नलावडे, विशाल सिन्हासारखे दिग्गज खेळाडू आपल्या सुपर फॉर्मात असल्यामुळे येत्या रविवारी १० मार्चला होणार्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत किताबासाठी काँटे की टक्कर होणार असल्याची शक्यता महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर यांनी वर्तवली आहे. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणूका जाहीर होणार असल्यामुळे मुंबई श्रीपाठोपाठ महाराष्ट्र श्रीसुद्धा मुंबईच्या अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात पार पाडली जाणार आहे
आजवर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या शहरी भागातील खेळाडूच सहभागी व्हायचे मात्र शरीरसौष्ठवाची गुणवत्ता ग्रामिण भागातही मोठ्या संख्येने दिसत असल्यामुळे शहरातील पीळदार देहयष्टीला ग्रामीण भागातल्या रांगड्या शरीरयष्टीचे जबरदस्त आव्हान असेल.
या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना शहरी विरुद्ध ग्रामिण असा शरीरसौष्ठवाचा अनोखा पीळदार थरार पाहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र बॅाडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॅा. संजय मोरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र श्रीबरोबर महिलांची मिस महाराष्ट्र श्री म्हणजेच महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिटनेस फिजीक अजिंक्यपद स्पर्धा खेळविली जाणार आहे. एवढेच नव्हे तर हल्ली तरुण खेळाडूंमध्ये सर्वात लोकप्रिय असलेली फिजीक स्पोर्ट्ससुद्धा खेळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंना विम्याचे कवच
महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंना विम्याचे कवच लाभावे म्हणून शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पीळदार सौंदर्य मुंबईत दाखल होणार असून सहभागी स्पर्धकांसह सर्वच शरीरसौष्ठवपटूंना विम्याचे कवच देण्याचे सिद्धेश कदम यांनी जाहीर केल्यामुळे त्यांच्यावर अवघ्या महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संघटनेच्या माध्यमातून राज्यातील किमान ५०० खेळाडूंचा २ लाखांचा विमा उतरविला जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
महाराष्ट्र श्रीमध्ये लाखोंचा वर्षाव
महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा इतिहासात प्रथमच तब्बल १५ लाखांच्या रोख पुरस्काराचा वर्षाव केला जाणार आहे. शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या सहकार्यामुळे राज्यातील सर्वोच्च शरीरसौष्ठव स्पर्धेला श्रीमंती लाभली आहे. स्पर्धेत एकंदर विविध १३ गट खेळविले जाणार असून प्रत्येक गटातील अव्वल सहा क्रमांकाना २०, १५, १२, १०, ७ आणि ५ हजारांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र किताब श्री विजेता भव्य चषकासह दोन लाखांच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र श्रीचा उपविजेताही १ लाखाचे इनाम जिंकेल आणि तिसर्या क्रमांकाच्या खेळाडूसाठीही ७५ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र श्री स्पर्धेबरोबर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मिस महाराष्ट्रसाठी होणार्या लढतीकडे लागले आहे. रेखा शिंदे , गौरी वरणकर, सुनीता सुटले, अनामिका सिंग, प्रतिमा कांबळे, कविता शिवरे या खेळाडू चांगल्या तयारीत असून राज्यभरातून किमान दहा ते पंधरा महिला शरीरसौष्ठवपटू सहभागी होतील.