भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने या सामन्यात माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. अश्विन आता भारतीय संघासाठी दुसरा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. याच पार्श्वभूमीवर कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे.
कपिल देव यांच्या मते अश्विनला अधिक संधी मिळाल्या असत्या, तर त्याने ही कामगिरी खूप आधीच केली असती. भारतीय संघासाठी माजी गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी सर्वाधिक ६१९ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर या यादीत कपिल देव (Kapil Dev) यांचे नाव होते. कपिल देव यांनी संपूर्ण कारकिर्दीत ४३४ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. आता रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने कपिल देव यांचा हा विक्रम मोडून या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
कपिल देव यांनी मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत त्यांना अश्विनच्या विक्रमाविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “ही एक मोठी कामगिरी आहे. खरं करून एका अशा खेळाडूसाठी, ज्याला अलिकडच्या दिवसांमध्ये खास संधी मिळालेल्या नाहीत. जर त्याला या संधी मिळाल्या असत्या, तर त्याने खूप आधी ४३४ विकेट्सचा टप्पा पार केला असता. मी त्याच्यासाठी खुश आहे, मी त्याला का अडवू ? माझी वेळ गेली आहे.”
माजी कर्णधार कपिल देव यांना अपेक्षा आहे की, त्यांचा विक्रम मोडण्यापेक्षाही मोठी कामगिरी अश्विन करेल. ते पुढे बोलताना म्हणाले की, “अश्विन एक अप्रतिम क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट आणि बुद्धिमान स्पिनर आहे. त्याला आता ५०० कसोटी विकेट्सचा लक्ष्य पार करायचे आहे. मला विश्वास आहे की, यापेक्षा जास्त विकेट्स घेईल.”
दरम्यान, पहिल्या कसोटीत अपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर अश्विनने त्यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिली. अधिकृत इस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अश्विनने लिहिले की, “२८ वर्षांपूर्वी, मी महान कपिल देवला त्यांच्या विश्वविक्रमासाठी प्रोत्साहित करत होतो. माझ्या मनात कधीच आले नव्हते की, मी ऑफ स्पिनर बनेल. आपल्या देशासाठी खेळेल आणि या महान खेळाडूने घेतलेल्या विकेट्सची संख्या पार करू शकेल. या खेळाने मला आतापर्यंत जे काही दिले आहे, त्यासाठी मी आनंदी आणि आभारी आहे.”
महत्वाच्या बातम्या –
अरर! लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची पँट फाटल्याने झाली फजिती, नेटकरी घेतायेत मजा
एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज