भारतीय क्रिकेटमध्ये सध्या भूकंप झाला आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची (Virat Kohli Removed As ODI Captain) हकालपट्टी झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये त्याची चर्चा सुरू असून, कोहलीच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यावरून सुरू झालेला वाद कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर (Virat Kohli Press Conference) आणखी वाढला.
कोहलीने बुधवार (१५ डिसेंबर) रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत यापूर्वी माहिती देण्यात आली नव्हती. यासोबतच कोहली म्हणाला होता की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी दावा केल्याप्रमाणे टी२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेताना त्याला कोणीही रोखले नाही. आता भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev Statment) यांनी या प्रकरणी आपले मत मांडले आहे.
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान कर्णधार कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपला निर्णय कोणाला सांगायचा की नाही ही निवडकर्त्यांची मर्जी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “निवडकर्त्यांनी विराट कोहलीइतके क्रिकेट खेळले नसेल. मात्र, त्यांना कर्णधारपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही, अगदी विराटलाही नाही. खेळाडूंनी त्याची अपेक्षा करू नये.”
यासोबतच गांगुली यांनी नुकतेच सांगितले होते की, टी२० कर्णधारपद सोडताना त्यांनी स्वतः कोहलीला राजीनामा देऊ नये असे सांगितले होते. मात्र, त्याला कोणीही रोखले नसल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष यांच्यातील वाद बोर्ड आणि भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेवर परिणाम झाला असून ,कोहलीने बोर्ड अध्यक्षांविरोधात बोलायला नको होते, असे कपिल यांनी म्हटले आहे. कपिल म्हणाले, “मी कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. पण, कोणत्याही खेळाडूने बीसीसीआय अध्यक्ष किंवा बोर्डाच्या विरोधात बोलू नये. जेव्हा मला कर्णधारपदावरून वगळण्यात आले तेव्हा मला खूप दुखापत झाली होती. तुम्ही देशासाठी खेळत आहात हे लक्षात ठेवा. यापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही.”
या संपूर्ण गदारोळानंतर बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु सध्याच्या वादाचा कोहलीच्या कसोटीतील कर्णधारपदावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा कपिल यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट
ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन






