राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान मंगळवारी (२१ सप्टेंबर) आयपीएल २०२१ मधील ३२ वा सामना खेळला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात अखेर राजस्थानने दोन धावांनी विजय साजरा केला. अखेरच्या षटकात पंजाबला ४ धावांची गरज असताना राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने अवघी एक धाव देत संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. सामन्यात अविस्मरणीय कामगिरी केल्याबद्दल सर्व थरांतून त्याचे कौतुक होत असताना, कार्तिकने आपल्या यशाचे श्रेय भारतीय संघातील वरिष्ठ गोलंदाजांना दिले.
कार्तिकचे अखेरचे ऐतिहासिक षटक
पंजाबला या सामन्यात विजयासाठी अखेरच्या षटकामध्ये ४ धावांची गरज होती. कार्तिकने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर ऐडन मार्करमने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पूरनला बाद करत सामन्यात रंगत आणली. चौथा चेंडूही निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर दीपक हुडा बाद झाल्याने अखेरच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आलेल्या फॅबियन ऍलनला एकही धाव काढण्यात यश आले नाही व राजस्थानने रोमहर्षक मिळवला.
कार्तिकच्या यशाचे ऑस्ट्रेलिया कनेक्शन
राजस्थानच्या विजयाचा नायक ठरलेल्या कार्तिकने आपल्या कामगिरीविषयी बोलताना म्हटले,
“मागील वर्षी आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर गेल्याचा फायदा मला झाला. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक व वरिष्ठ गोलंदाजांनी मला मी चेंडू खूपच आखूड टप्प्याचे टाकत असल्याचे सांगितले. तेव्हापासून मी चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो. आज ती सर्व योजना मैदानावर अमलात आणली. त्या सर्वांनी मला माझ्याकडे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचे कौशल्य असल्याचे सांगितले होते.”
मागील वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला असताना टी नटराजनसह कार्तिक त्यागीला नेट बॉलर म्हणून संधी देण्यात आली होती. जवळपास सर्वच प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाले असताना तो अखेरचा वेगवान गोलंदाज शिल्लक राहिला होता ज्याने त्या दौऱ्यात सामना खेळला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
एका सोशल मीडिया पोस्टमुळे पंजाबचा ‘हा’ खेळाडू आला गोत्यात; लवकरच होणार चौकशी
‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण
निवृत्तीनंतरही वादात अडकला मार्लेन सॅम्युअल्स; आयसीसीने लावले गंभीर आरोप; होऊ शकते मोठी कारवाई