---Advertisement---

आयएसएलची धडाक्यात सुरुवात; रॉय ठरला एटीके मोहन बागानच्या विजयाचा नायक

On: शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020 9:38 PM
---Advertisement---

भारतीय फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाला वांबोळी येथील जीएमसी मैदानावर धडाक्यात सुरुवात झाली. एटीके मोहन बागानने केरला ब्लास्टर्सला १-० अशा गोलफरकाने पराभूत करत हंगामाची विजयी सुरुवात केली. एटीकेच्या विजयाचा नायक ठरला रॉय कृष्णा.

पहिल्या सत्रात राहिली गोलशून्य बरोबरी

स्पॅनिश प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या उभय संघातील खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता. मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघांनी वेग पकडला. एटीकेचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने गोल करण्याच्या २ संधी दवडल्या. केरलाच्या अनुभवी गॅरी हूपरने काही चांगल्या चाली रचत; एटीके मोहन बागानच्या खेळाडूंमध्ये खळबळ माजवली. परिणामी, ४१ व्या मिनिटाला एटीकेच्या एडू गार्सियाला फाऊल करणे भाग पडले. हंगामातील पहिले ‘यलो कार्ड’ गार्सियाच्या नावे लिहिले गेले. केरलाच्या खेळाडूंनी एटीकेच्या गोलक्षेत्रात वारंवार आक्रमण केले. मात्र, तिरी, प्रीतम कोटल व संदेश झिंगन यांचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

दुसऱ्या सत्राची वेगवान सुरुवात

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांनी दुसऱ्या सत्राची वेगवान सुरुवात केली. ५० व्या मिनिटाला केरलाचा युवा आघाडीवीर सेहल अब्दुल समद गोल करण्यात अपयशी ठरला. केरलाच्या खेळाडूंनी आक्रमण करूनही त्यांना सामनातील पहिला गोल करण्यात यश लाभत नव्हते.

रॉय कृष्णा ठरला पहिल्या गोलचा मानकरी

अखेरीस, सामन्यातील ६७ व्या मिनिटाला एटीकेच्या मनवीर सिंहने डाव्या बगलेतून सुरेख चाल रचली. मनवीरने उंचावरून दिलेला पास केरलाचा कर्णधार सिडोला लागून मैदानात पडला आणि मागील हंगामात सर्वाधिक गोल करणारा एटीकेचा स्टार स्ट्रायकर रॉय कृष्णा याने संधी साधत; हंगामातील पहिला गोल आपल्या नावे केला.

https://twitter.com/IndSuperLeague/status/1329810542098227200

एटीकेची विजयी सुरुवात

एटीकेने झळकावलेल्या गोलची बरोबरी साधण्याचा केरला ब्लास्टर्सने आटोकाट प्रयत्न केला. केरलाचे प्रशिक्षक किबू विकूना यांनी कर्णधार सिडो याला माघारी बोलवून ऑस्ट्रेलियाच्या मरे याला संधी दिली. मात्र, तो देखील आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. सामन्यातील अखेरच्या १० मिनिटात एटीकेच्या खेळाडूंनी चेंडू आपल्याकडे राखत; सामना बरोबरीत येणार नाही याची काळजी घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---