हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)मध्ये गतविजेत्या हैदराबाद एफसीची अपराजित आणि क्लीन शीटची मालिका आज खंडित झाली. हिरो आयएसएलच्या मागील पर्वातील फायनलनंतर प्रथमच केरळा ब्लास्टर्स व हैदराबाद एफसी समोरासमोर आल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मागील पर्वातील फायनलमध्ये हैदराबादने पेनल्टी वर विजय मिळवला होता. पण, आज केरळा ब्लास्टर्सने आक्रमक खेळ केला आणि दिमित्रिओस डिआमांटाकोस (१८ मि.) याच्या भन्नाट गोलच्या जोरावर आघाडी घेतली. ती अखेरपर्यंत कायम राखताना केरळा ब्लास्टर्सने १-० असा विजय मिळवला. हिरो आयएसएलच्या या पर्वातील हैदराबादचा ६ सामन्यानंतर हा पहिलाच पराभव ठरला. हैदराबादने आजच्या लढतीपूर्वी १ अनिर्णित व ५ विजय असे निकाल नोंदवले होते. केरळा ब्लास्टर्सने विजय मिळवून १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
हिरो आयएसएलच्या या पर्वातील आतापर्यंत अपराजित राहिलेल्या दोन संघांपैकी एक असलेल्या हैदराबादला आज मोठा विक्रम करण्याची संधी होती. आयएसएलच्या इतिहासात सलग पाच सामन्यांत क्लीन शीट ( प्रतिस्पर्धींना गोल न करू देणे) राखण्याच्या एफसी गोवा ( २०१८-१९) व मुंबई सिटी एफसी ( २०१४-१५) यांच्या विक्रमाशी हैदराबादने बरोबरी केली होती. आजचा सामनाही क्लीन शीट राखून नवा विक्रम करण्याची संधी यजमानांना होती. पहिल्या ६-७ मिनिटांत चांगला खेळ केल्यानंतर हैदराबादच्या बचावात चुका झाल्या आणि केरळा ब्लास्टर्सने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. १८व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सने यजमानांची क्लीन शीटची मालिका खंडित केली.
एड्रियन लुनाने गोलजाळीच्या दिशेने मारलेला चेंडू रोखण्यासाठी हैदराबादचा गोलरक्षक अनुज कुमार पुढे आला, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटला. समोरच उभ्या असलेल् या दिमित्रिओस डिआमांटाकोसने केरळा ब्लास्टर्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतरही केरळाकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरूच होते, परंतु यावेळेस अनुजने चूक केली नाही. हैदराबाद बचावात्मक खेळावर भर देताना दिसला. २२व्या मिनिटाला हैदराबादच्या बार्थोलोमेव ऑग्बेचेने बरोबरीच्या गोलसाठी केलेला प्रयत्न केरळा ब्लास्टर्सच्या बचावपटूंकडून अडवला केला. ३४व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सला गोलस्कोअरर डिआमांटाकोसला दुखापतीमुळे मैदानाबाहेर पाठवावे लागले.
सहल अब्दुल समदसाठी ३७व्या मिनिटाला लुनाने सोपी संधी निर्माण केली होती, परंतु समदला हेडरद्वारे टोलावलेला चेंडू ऑन टार्गेट राखता आला नाही. यामुळे लुना थोडा नाराज दिसला, परंतु रिप्ले मध्ये रेफरीने फ्लॅग उचलला होता आणि हा गोल झाला असता तरी ग्राह्य धरला गेला नसता. पहिल्या हाफ मध्ये केरळा ब्लास्टर्सने वर्चस्व राखले. हैदराबादने चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा राखला होता, परंतु त्यांना केरळाच्या बचावपटूंनी गोल करण्याची संधी निर्माण करू दिली नाही. ४५व्या मिनिटाला ऑग्बेचेने ६ यार्डजवळून गोल करण्याची सोपी संधी गमावली आणि ब्लास्टर्सने १-० अशी आघाडी कायम ठेवली. ५१व्या मिनिटाला जोएल चायनीझेला वन ऑन वन प्रयत्नात हैदराबादसाठी बरोबरीचा गोल करता आला असता, परंतु ब्लास्टर्सच्या गोलरक्षक प्रभसुखन गिलने तो रोखला.
3️⃣rd win on the trot! 👊🔥#HFCKBFC #ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/9rNs0KtGIG
— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) November 19, 2022
पुढच्याच मिनिटाला ब्लास्टर्सकडून आक्रमण झाले आणि राहुल केपीचा ऑन टार्गेट प्रयत्न हैदराबादच्या अनुजने अप्रतिम रित्या रोखला. ब्लास्टर्स आणि हैदराबाद दोन्ही संघांकडून अखेरच्या ३० मिनिटांत आक्रमणतेची धार तीव्र झालेली दिसल्याने प्रेक्षकांचाही उत्साह वाढला. ६६व्या मिनिटाला राहुल केपीने ऑन टार्गेट प्रयत्न केला अन् हैदराबादच्या गोलरक्षकाने तो रोखला. ब्लास्टर्सचे खेळाडू वरचढ झालेले दिसल्याने हैदराबादचा अनुभवी खेळाडू जाओ व्हिक्टर संतापलेला दिसला. हैदराबादकडूनही प्रयत्न होत होते, परंतु त्यांना गोल काही करता येत नव्हता. अखेरच्या १० मिनिटांत खेळ अधिक रोमहर्षक झाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये फिजिकल चॅलेंज आलेले पाहायला मिळाले. ९०+५ मिनिटाला व्हिक्टरने बरोबरीचा गोल करण्याची संधी गमावली अन् केरळा ब्लास्टर्सने बाजी मारली. Kerala Blasters end Hyderabad FC’s unbeaten run with 1-0 victory in rematch between last season’s finalists
निकाल : केरळा ब्लास्टर्स १ (दिमित्रिओस डिआमांटाकोस १८ मि.) विजयी वि. हैदराबाद एफसी ०.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट
जगज्जेता इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियासमोर ढेर, कर्णधाराने पराभवासाठी ‘यांना’ धरले जबाबदार