गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा केरला ब्लास्टर्सने अखेर संपुष्टात आणली. रविवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ब्लास्टर्सने हैदराबाद एफसीवर 2-0 अशी मात केली. दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी एक गोल करीत ब्लास्टर्सने विजय साकारला.
बचाव फळीतील केरळच्या 26 वर्षीय अब्दूल हक्कू याने ब्लास्टर्सचे खाते 29व्या मिनिटाला उघडले. दुसऱ्या सत्रात आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय जॉर्डन मरे याने दुसरा गोल केला.
स्पेनच्या किबु व्हिकूना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्लास्टर्सचा हा सात सामन्यांतील पहिलाच विजय असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण झाले. त्यांचे नववे स्थान कायम राहिले. हैदराबादला सात सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण व आठवे स्थान कायम राहिले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या 11 संघांमध्ये आता अद्याप एकही विजय मिळवू न शकलेल्या संघांमध्ये एससी ईस्ट बंगाल आणि ओदिशा एफसी या दोनच संघांचा समावेश आहे.
मलप्पुरमच्या हक्कू याला मोसमात प्रथमच स्टार्टींग लाईन-अपमध्ये संधी मिळाली होती. याआधी गेल्या मोसमात जानेवारीत जमशेदपूरविरुद्ध त्याला स्टार्ट मिळाली होती. दुखापतींमुळे त्याला गेल्या तीन मोसमांमध्ये केवळ सहा वेळा स्टार मिळू शकली होती. बाकारी कोने आणि कोस्टा न्हामोईनेस्कू यांना दुखापतीमुळे या लढतीला मुकावे लागल्यामुळे हक्कूला संधी मिळाली होती. या संधीचे हक्कूने चीज केले.
मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचेही सात सामन्यांतून 16 गुण आहेत. यात मुंबईचा 8 (11-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) गोलफरकापेक्षा तीनने सरस आहे. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी व एफसी गोवा यांची 8 सामन्यांतून 11 गुण अशी समान कामगिरी आहे. यात नॉर्थईस्टचा 2 (10-8) गोलफरक गोव्याच्या 1 (10-9) गोलफरकापेक्षा सरस आहे. त्यामुळे नॉर्थईस्ट चौथ्या स्थानावर आहे.
खाते उघडण्याची शर्यत ब्लास्टर्सने जिंकली. आघाडी फळीतील फॅक्युंडो पेरीराने अफलातून कॉर्नर-कीक मारली. गोलक्षेत्रात आलेला चेंडू हक्कूने हेडिंगद्वारे नेटमध्ये घालवताना हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला चकवले. दोन मिनिटे बाकी असताना मध्य फळीतील बदली खेळाडू रोहित कुमार याने डावीकडून मध्यरक्षक के. पी. राहुल याच्या पायापाशी चेंडू मारला. हा चेंडू हैदराबादचा बदली मध्यरक्षक आदील खान याला लागून मरेच्या दिशेने गेला. मरेने मग अचूक फटका मारत गोल केला.
ब्लास्टर्सचा स्ट्रायकर जॉर्डन मरे याने तिसऱ्याच मिनिटाला हैदराबादच्या क्षेत्रात मुसंडी मारली, पण फटका मारण्यापूर्वीच त्याला रोखण्यात आले.
आठव्या मिनिटाला ब्लास्टर्सचा स्ट्रायकर लिस्टन कुलासो याने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळवून मध्य फळीतील महंमद यासीरला पास दिला. यासीरने दोन प्रतिस्पर्ध्यांना हुलकावणी देताना कॉर्नर मिळवला. आशिष रायने घेतलेल्या कॉर्नरवर अरीडेन सँटाना याने उडी मारत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला साहल अब्दुल समद याला बॉक्सलगत चेंडू मिळाला. त्याने आगेकूच करणाऱ्या जेसील कार्नेरीओला डावीकडे पास दिला. कार्नेरीओने प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: ईस्ट बंगाल अन् चेन्नईयन संघातील सामन्यात थरारक बरोबरी
– आयएसएल २०२०: चेन्नईयनला नमवत पहिल्या विजयाचा ईस्ट बंगालचा निर्धार
– आयएसएल २०२०: गोव्याचा जमशेदूपरवर दिमाखदार विजय; अँग्युलोच्या दोन गोलांचे मोलाचे योगदान