गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) संडे स्पेशल (६ मार्च) साखळी सामन्यात केरला ब्लास्टर्स एफसी आणि एफसी गोवा यांच्यातील लढतीद्वारे आठव्या हंगामात उपांत्य फेरी गाठणाऱ्या चौथ्या संघावर शिक्कामोर्तब होईल.
जमशेदपूर एफसी, एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसीने प्ले-ऑफ फेरीच्या अंतिम चार संघांतील स्थान निश्चित केले आहे. चौथ्या स्थानासाठी गतविजेता मुंबईसह केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यात चुरस आहे. ताज्या गुणतालिकेत केरलाच्या खात्यात १९ सामन्यांतून ३३ गुण आहेत. ते चौथ्या स्थानी आहेत. यंदाच्या हंगामातील पॉइंट्स टेबलमधील टॉप फोरमधील स्थान कायम राखण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. एफसी गोवाने बरोबरी रोखले किंवा पराभूत केले तर मुंबई सिटी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील लढतीवर केरलाचे पुढील भवितव्य अवलंबून राहील.
आठव्या हंगामात नऊ विजय मिळवलेल्या केरला संघाला यंदाच्या हंगामात विजयी हॅटट्रिकची संधी चालून आली आहे. मागील दोन लढतींमध्ये त्यांनी गतविजेता मुंबई सिटी आणि चेन्नईयन एफसीवर मोठ्या फरकाने मात केली आहे. शेवटच्या लढतीतील प्रतिस्पर्धी तुलनेत कमकुवत असल्याने केरला ब्लास्टर्सचे पारडे जड आहे. प्रत्येक सामना जिंकण्यादृष्टीनेच आम्ही मैदानात उतरतो. आठव्या हंगामाचा शेवट गोड करण्यासह पूर्णपणे तीन गुण वसूल करण्याला आमचे प्राधान्य राहील. मात्र, प्रतिस्पर्धी संघाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही, असे केरलाचे मुख्य प्रशिक्षक इव्हान वुकोमॅनोव्हिक यांनी म्हटले आहे.
एफसी गोवासाठी यंदाचा हंगाम वाईट गेला. १९ सामन्यांत त्यांना १८ गुणांवर समाधान मानावे लागले. त्यात ४ विजय, ६ बरोबरी आणि ९ पराभवांचा समावेश आहे. ढेपाळलेला एफसी गोवा क्लब ताज्या गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. हंगामाचा शेवट गोड करून वरचे स्थान मिळवण्याला वाव असला तरी मागील तीन लढतींमध्ये गोवा एफसीला पराभव पाहावा लागला आहे. त्यामुळे अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवलेल्या केरला ब्लास्टर्सविरुद्ध त्यांच्यासमोर सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान आहे.
झाले गेले विसरून आठव्या हंगामाचा शेवट गोड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ असला तरी आम्ही सर्वोत्तम खेळाला प्राधान्य देऊ, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक डेरीक परेरा यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू
मोहन बागानचीही ‘प्ले-ऑफ’मध्ये धडक; चेन्नईयनवर निसटता विजय