---Advertisement---

‘केविन ओब्रायन’ने तेव्हा गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली होती! वाचा २०११च्या विश्वचषकातील ‘त्या’ ऐतिहासिक खेळीबद्दल

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 3:58 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वचषकांवेळी क्रिकेटमध्ये प्रस्थापित असलेल्या देशांचे म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि कधीतरी श्रीलंका व न्यूझीलंडच्या खेळाडूंची जास्त वाहवा होत असते. या देशांचे खेळाडू एखादी मोठी खेळी करतात किंवा जास्त बळी घेण्याची कामगिरी करतात तेव्हा त्या खेळाडूंच्या कौतुकावर रकानेच्या रकाने लिहिले जातात. मात्र, सहयोगी देशांच्या खेळाडूंनी केलेली अशी एखादी खेळी चाहत्यांच्या जास्त दिवस स्मरणात राहत नाही. परंतु, भारतीय उपखंडात आयोजित २०११ विश्वचषकावेळी आयर्लंडच्या एका खेळाडूने केलेली एक ऐतिहासिक खेळी कोणताही सच्चा क्रिकेटप्रेमी आजही विसरला नसेल. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरची ती खेळी खेळणारा फलंदाज होता आयर्लंडचा अष्टपैलू केविन ओब्रायन. आज(४ मार्च) त्या केविन ओब्रायनचा वाढदिवस.

सख्खा शेजाऱ्यांचा सामना
भारतीय उपखंडात तिसऱ्यांदा आयोजित होत असलेल्या वनडे विश्वचषकातील तो पंधरावा सामना. बेंगलोरच्या फलंदाजांना नंदनवन असणाऱ्या खेळपट्टीवर हा सामना खेळला जाणार होता. इंग्लंडने भारताविरुद्धचा आपला मागील सामना ३३९ धावांचे आव्हान असताना टाय केला होता. तर, आयर्लंडला बांगलादेश विरुद्ध विजयाची संधी असतानाही फलंदाजांनी कच खाल्ल्यामुळे २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागलेला. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून पूर्ण गुण घेण्याच्या इराद्याने हे दोन्ही सख्खे शेजारी देश २ मार्च या दिवशी मैदानात उतरले.

इंग्लंडची तुफानी फलंदाजी
इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने नाणेफेक जिंकून कसलाही विचार न करता प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्ट्रॉसने सलामीसाठी नेहमी मधल्या फळीत खेळणाऱ्या अनुभवी केविन पीटरसनला साथीला घेतले. दोघांनीही आयर्लंडच्या अनुभवी नसणाऱ्या गोलंदाजांवर चांगलेच आक्रमण केले. अवघ्या १३ षटकात ९१ धावांची सलामी दिल्यानंतर स्ट्रॉस माघारी परतला. धावसंख्येत आणखी वीसची भर पडल्यानंतर पीटरसनदेखील ५९ धावा करून चालता झाला. त्यानंतर मात्र, त्यावेळी इंग्लंड संघातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज म्हटला जाणारा जोनाथन ट्रॉट व अनुभवी इयान बेलने आयर्लंडची घंटी वाजवली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १६७ धावा जोडून इंग्लंडला सुस्थितीत आणले. ट्रॉटने ९२ तर बेलने ८१ धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज काही विशेष कामगिरी न करू शकल्याने इंग्लंडची धावसंख्या ३२७ पर्यंत मर्यादित राहिली. आयर्लंडसाठी अष्टपैलू जॉन मुनीने सर्वाधिक चार बळी मिळवले.

आयर्लंडची खराब सुरुवात
इंग्लंडने दिलेले ३२८ धावांचे डोंगराएवढे आव्हान पार करताना कर्णधार विल्यम पॉटरफिल्ड डावाच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. दुसरा सलामीवीर पॉल स्टर्लिंग व इंग्लंडचा माजी खेळाडू मात्र आयर्लंडकडून खेळणाऱ्या एड जॉएसने प्रत्येकी ३२ धावा बनवून थोडाफार डाव सावरला. इंग्लंडचा हुकमी एक्का फिरकीपटू ग्रॅमी स्वान गोलंदाजीला आला आणि सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकू लागले. त्याने नील ओब्रायन, जॉएस व गॅरी विल्सन यांना ठराविक अंतराने बाद करत आयर्लंडची अवस्था ५ बाद १११ अशी करून टाकली.

केविन ओब्रायन नावाचे वादळ
विल्सन बाद झाल्यानंतर मैदानात उतरला यष्टीरक्षक नील ओब्रायनचा अष्टपैलू भाऊ केविन ओब्रायन. केनियात झालेल्या वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या धावा काढल्यामुळे तो आक्रमक फलंदाज आहे, अशी थोडीफार ओळख सर्वांना होती. डावाच्या सुरुवातीलाच एक कड लागलेला चौकार त्याला मिळाला. इंग्लंड दुसरा फिरकीपटू मायकेल यार्डीला दोन चौकार मारून त्याने चाहत्यांना टाळ्या वाजवण्याची संधी दिली.

केविनच्या फटक्यांची ताकत तर तेव्हा दिसली जेव्हा त्या सामन्यात वर्चस्व गाजवत असलेल्या स्वानला त्याने मिडविकेटला स्विपने दोन षटकार लगावले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३७ धावांवर असताना चुकीचा फटका मारून बाद झालेला केविन, आज काही चुकी करायची नाही या इराद्याने मैदानात उतरलेला.

त्यावेळी इंग्लंड संघाचा सर्वात्तम गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनला षटकार मारत त्याने अवघ्या ३० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. केविन आपल्याला त्रासदायक ठरणार असे वाटू लागल्याने, तो ८० धावांच्या आसपास असताना इंग्लंडचा यष्टिरक्षक मॅट प्रायर व जेम्स अँडरसनने त्याला स्लेज करायला सुरुवात केली. मात्र, त्यावर कसलाही परिणाम झाला नाही आणि त्याने पुन्हा दोन चौकार ठोकले.

तो ऐतिहासिक क्षण
डावातील ४१ व्या षटकातील अखेरचा चेंडू लेग साइडला ढकलत केविनने ५० चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा कारनामा केला. हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक होते. विजयासाठी अवघ्या १२ धावा शिल्लक असताना तो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. केविनने आपल्या या संस्मरणीय खेळीत ६३ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार व ७ गगनचुंबी षटकारांच्या सहाय्याने आणि १७९ च्या तुफानी स्ट्राइक रेटने इतिहासाच्या पानात नोंद होतील अशा ११३ धावा ठोकल्या होत्या. आपल्या वाढदिवसाच्या अगदी दोन दिवसापूर्वी त्याने ही अफलातून खेळी खेळली.

केविन बाद झाला तरी संघाला विजयीरेषेपलीकडे नेण्याचे काम अष्टपैलू जॉन मुनीने केले. अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुननीने चौकार खेचल्यानंतर, विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर आयर्लंडने केला.

आजही जेव्हा-केव्हा क्रिकेट विश्वचषकातील कधीही न विसरता येणाऱ्या खेळ्यांविषयी चर्चा होते तेव्हा केविन ओब्रायनच्या, विस्डेनने दशकातील तिसरी सर्वोत्तम खेळी म्हणून गौरवलेल्या या खेळीचा उल्लेख झाल्यावाचून राहत नाही.

वाचा –

साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’

वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा इंझमाम-उल-हक

राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---