पुणे: देशात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी, यादृष्टीने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स महोत्सवानिमित्त क्रीडा क्षेत्राविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडा चाहत्यांसाठीही अत्यंत सुवर्णसंधी असणार आहे. महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे ९ जानेवारीपासून यास्पर्धेस प्रारंभ होणार आहे.
त्यानिमित्त क्रीडाविषयक व्याख्याने, संवाद, चर्चासत्र, प्रदर्शन, कार्यशाळा, ज्येष्ठ खेळाडू व संघटकांचे अनुभवकथन आदी उपक्रम आयोजित केले जाणार आहे. स्पर्धेनिमित्त २० जानेवारीपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये क्रीडाविषयक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. क्रीडा संस्कृतीचा प्रचार व प्रसार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत, हे उपक्रम चालणार आहेत.
क्रीडाविषयक २० हून अधिक घटकांची सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी येथील स्पर्धा म्हणजे व्यासपीठ असणार आहे. खेळाडूंचा आहार, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, दुखापती प्रतिबंधक व्यायाम, दुखापतींवरील उपचार, उत्तेजकविरोधी मोहिते आदींबाबबत विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षकांचा दर्जा उंचवावा, यासाठी प्रशिक्षक व मार्गदर्शकांकरीता उद््बोधक वर्ग आयोजित केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रातील कौशल्य विकासास कशी चालना दिली जाऊ शकते, याबाबतही चर्चासत्र होईल.
भारतामध्ये अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे करिअर केले, हे जाणून घेण्यासाठी खेळाडू संवाद हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये अनेक आॅलिंपिकपटू सहभागी होती. खेळाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण कसे करता येईल, याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.