पुणे। बॅडमिंटनमध्ये रविवारी महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले. सतरा वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या फडके यांनी अजिंक्यपद मिळविताना राजस्थानच्या साक्षी असरानी व अनुष्का मेहता यांचा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. हा सामना त्यांनी २१-१६, २१-१३ असा जिंकला. तसेच मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या अमन फारुख संजय याने अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.
अनन्या ही पुण्यात हेमंत हर्डीकर व समीर भागवत यांच्याकडे प्रशिक्षण घेते. आर्या ही मूळची सातारा येथील खेळाडू असून तिला उदय पवार व संग्राम कदम यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सध्या ती शिवछत्रपती क्रीडानगरीत निखिल कानेटकर अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.
२१ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राच्या मालविका अडसूळ हिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आकर्षि कश्यप हिच्यापुढे प्रभाव दाखविता आला नाही. कश्यप हिने हा सामना २१-११, २१-१६ असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. तर, मालविका हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अमन याने उत्कंठापूर्ण लढतीत कर्नाटकच्या राहुल भारद्वाज याचे आव्हान २१-१७, २३-२१ असे परतविले. हा सामना विलक्षण रंगतदार झाला. अव्वल मानांकन मिळालेल्या अमन याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.
मुलांच्या १७ वषार्खालील गटाच्या एकेरीत तेलंगणाच्या गंधव प्रणव राव याने हरयाणाच्या रवीकुमार याच्यावर १५-२१, २१-१८, २१-११ अशी मात केली. पहिली गेम गमावल्यानंतर परतीचे फटके व प्लेसिंगवर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली. दुहेरीत राजस्थानच्या निकुंज पांडे व शुभम पटेल यांनी विजेतेपद मिळविले. त्यांनी तामिळनाडूच्या सी.एस.कौशिक व आर.विकास प्रभू यांना २१-१५, २२-२० असे हरविले.
मुलींच्या १७ वषार्खालील एकेरीत गुजरातच्या मीर तस्नीम इरफान अली हिने अजिंक्यपदावर नाव कोरले. चुरशीच्या लढतीत तिने उत्तरप्रदेशच्या मानसी सिंग हिला २३-२१, २१-१६ असे पराभूत केले.