पुणे। महाराष्ट्राला बास्केटबॉलमध्ये संमिश्र यशास सामोरे जावे लागले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. त्यांनी कर्नाटकला रंगतदार लढतीत ८०-७४ असे पराभूत केले. पूर्वार्धात त्यांनी ४१-३६ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून श्रुती शेरीगर, अंशिका कनोजिया, ऋतुजा पवार व श्रेया दांडेकर यांनी उल्लेखनीय खेळ केला. कर्नाटक संघाकडून लोगोमुद्रा व ए.बांदविया यांनी दिलेली लढत असफल ठरली.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा दुरावल्या आहेत. बलाढ्य पंजाबच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राचा बचाव निष्फळ ठरला, त्यामुळेच त्यांना ४८-७२ असा पराभव पत्करावा लागला. पूर्वार्धात पंजाबने ३८-२० अशी आघाडी घेतली होती. पंजाबकडून अरविंदरसिंग व राजिंदरसिंंग हे चमकले. महाराष्ट्राकडून प्रीतिश कोकाटे व रझा शेख यांचे प्रयत्न अपुरे ठरले. याच वयोगटात राजस्थान संघाने पूर्वाधार्तील ३९-४२ अशा पिछाडीवरुन बहारदार खेळ करीत मध्यप्रदेशला ८८-७७ असे हरविले. सुवर्णपदकासाठी दावेदार असलेल्या केरळने कर्नाटकवर ८२-७३ असा विजय मिळविला.
याच स्पर्धेतील २१ वषार्खालील गटात तामिळनाडू संघाने गुणांचे शतक नोंदवित राजस्थानचा ११६-७३ असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी ६२-२१ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला होता. दिल्ली संघाने उत्तरप्रदेशला ८९-७३ असे हरविले. पंजाब संघाने शतक नोंदविताना कर्नाटकचा १०१-५६ असा पराभव केला. मुलींच्या २१ वषार्खालील गटात तामि़ळनाडूने गुजराथला ७९-३६ असे सहज नमविले.
व्हॉलिबॉल – आंध्रप्रदेशकडून महाराष्ट्राचा पराभव
महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुलांच्या विभागात पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना आंध्रप्रदेश संघाने २६-२४, २५-१४, २५-२० असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या खेळांडूंनी आंध्रप्रदेश संघाला कौतुकास्पद लढत दिली. तथापि आक्रमक स्मॅशिंग करीत आंध्रप्रदेशने हा सामना जिंकला. त्याचे श्रेय पवन कल्याण व साईराम यांच्या अष्टपैलू खेळास द्याावे लागेल. महाराष्ट्राच्या केशव गायकवाड व व्ही.आदित्य यांनी चांगली झुंज दिली. याच वयोगटातील अन्य सामन्यात तामिळनाडू संघाने हरयाणाचा २५-२३, २५-२७, २५-१२, २५-१८ असा पराभव केला.






