चेन्नई : अंकुर तिवारी, सानिध्य मोरे यांनी वेटलिफ्टिंगमध्ये, तर पृथा वर्टीकर – सायली वाणी व तनिशा कोटेचा -रिशा मीरचंदानी यांनी टेबलटेनिसमध्ये पदके जिंकताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत ४ पदकांची भर घातली आहे. कालप्रमाणेच आज देखील महाराष्ट्राच्या खेळाडूनी वेटलिफ्टिंग आणि टेबलटेनिस या खेळांत असलेले महाराष्ट्राचे वर्चस्व अधोरेखित केले. टेनिसमध्ये तनिष्क जाधव – काहीर वारीक यांच्या जोडीने तर बॅडमिंटनमध्ये श्रावणी वाळेकर -तारिणी सूरी यांच्या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश करताना महाराष्ट्रासाठी पदकांची निश्चिती केली आहे.
अंकुर तिवारी, सानिध्य मोरे यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंग मधील आपला दबदबा कायम ठेवला. आज अंकुर तिवारी याने १०२ किलो वजनी गटात तर सानिध्य मोरे याने ८९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.
अंकुर याने १०२ किलो गटात स्नॅचमध्ये १२४ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १५५ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले. त्याचे सुवर्णपदक केवळ एका किलोने हुकले. आंध्र प्रदेशच्या सीएच वामसी याने २८० किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. अंकुर याचे या स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय युवा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्याची आशियाई स्पर्धेसाठी रशियामध्ये झालेल्या प्रशिक्षण शिबिरातही निवड झाली होती. तो मुंबईचा खेळाडू असून गेले तीन वर्षे तो संभाजीनगर येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
सानिध्य याने ८९ किलो गटाच्या स्नॅचमध्ये १३५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १५६ किलो असे एकूण २९१ किलो वजन उचलले. त्याने आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेमध्ये एक सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले आहे. त्याने युवा राष्ट्रीय स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली होती तर कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला कांस्य पदक मिळाले होते. त्याचे वडील संजय मोरे हेच त्याचे प्रशिक्षक असून तो कल्याण येथे सराव करतो. तो जीवनदीप महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. त्याची बहीण शिवानी हीदेखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहे.
टेबलटेनिसमध्ये महाराष्ट्राला १ सुवर्ण, १ रौप्य
मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने महाराष्ट्राच्याच तनिशा कोटेचा आणि रिशा मीरचंदानी यांच्या जोडीला ६-११, ११-७,११-९,११-६ असे पराभूत करताना सुवर्ण पदक कमावले. अंतिम लढतीत पराभूत झाल्याने तनिशा आणि रिशाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य लढतीमध्ये तनिषा कोटेचा व रिशा मीरचंदानी यांनी हरयाणाच्या सुहाना सैनी व प्रितोकी चक्रवर्ती यांना तर पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने पश्चिम बंगालच्या सेन्ड्रीला दास, शुभंक्रिता दत्ता यांच्या जोडीला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
बॅडमिंटनच्या दुहेरीत महाराष्ट्र अंतिम फेरीत
अत्यंत अतितटीच्या लढातीत महाराष्ट्राच्या श्रावणी वाळेकर आणि तारिणी सूरी यांनी उत्तराखंडच्या गायत्री रावत व मान्सा रावत यांचे आव्हान २१-१८, १६-२१, २२-२० असे मोडून काढताना बॅडमिंटनच्या मुलींच्या गटातील दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिला गेम महाराष्ट्राने जिंकल्यानंतर उत्तराखंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना दुसरा गेम जिंकला. मात्र, तिसऱ्या गेममध्ये श्रावणी आणि तारिणी यांनी योग्य समन्वय राखताना आक्रमक खेळ करून सामना जिंकला.
मुलीच्या एकेरीच्या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या निशा भोयटेला आंध्र प्रदेशच्या टी. सूर्या चरिष्मा हिने १३-२१, १६-२१ असे पराभूत केले. यामुळे मुलीच्या एकेरीतील महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.
तनिष्क आणि काहीरची जोडी टेनिसमध्ये अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या तनिष्क जाधव आणि काहीर वारीक यांच्या जोडीने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना तामिळनाडूच्या कावीन कार्तिक आणि ए. सिवा गुरु यांच्या जोडीला ६-२, ६-४ असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तनिष्क आणि काहीर यांनी सुरेख समन्वय राखताना जोरदार फोरहॅन्डच्या फटके मारताना पॉईंट्सची कमाई केली. दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाब आणि तामिळनाडू यांची लढत होवून, या लढतीचा विजेत्याचे आव्हान अंतिम फेरीत महाराष्ट्रासमोर असणार आहे.
(Khelo India Youth Sports Tournament. Maharashtra won 1 gold and 3 silver medals on the eleventh day of the competition)
महत्वाच्या बातम्या –
सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस बीयु, यार्डी संघांची विजयी सलामी
हैद्राबाद येथे होणाऱ्या ४९व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे संघ जाहीर.