रविवारी (१९ डिसेंबर) होणाऱ्या बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किदाम्बी श्रीकांत वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचे पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत. अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे. श्रीकांतपूर्वी केवळ प्रकाश पदुकोण आणि बी साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत देशासाठी पदके जिंकली आहेत. मात्र, उपांत्य फेरीत दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर आता श्रीकांतला विश्वविजेता बनून इतिहास रचण्याची संधी असेल. भारताकडून आतापर्यंत केवळ पीव्ही सिंधूलाच ही स्पर्धा जिंकता आली आहे.
शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतने देशबांधव लक्ष्य सेनचा १७-२१, २१-१४, २१-१७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोघांमधील हा सामना जवळपास ६९ मिनिटे चालला. लक्ष्य सेनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत स्थान निश्चित करणाऱ्या किदाम्बी श्रीकांतचा सामना आता सिंगापूरच्या कीन येव लोह या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या २८ वर्षीय खेळाडूने २६ मिनिटांच्या लढतीत नेदरलँड्सच्या मार्क कलजाऊचा २१-८, २१-७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१८ मध्ये श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल ठरला होता. २०१७ मध्ये त्याने चार सुपरसिरीज जिंकल्या होत्या. असे करणारा तो देशातील पहिला बॅडमिंटनपटू होता.
कोठे पाहता येणार सामना
स्पर्धेच्या अंतिम दिवसाचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होतील. मात्र, पुरुष एकेरीचा अंतिम सामना हा अंदाजे पाच वाजता सुरू होऊ शकतो. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रसारण करण्यात येईल. हॉटस्टार या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर देखील हा सामना पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ‘फायनल फ्रंटियर’ बनलाय दक्षिण आफ्रिका दौरा; यावेळी विजयाची सर्वाधिक संधी
“भारत २-१ ने दक्षिण आफ्रिकेला लोळवेल”; माजी खेळाडूने दाखवला टीम इंडियावर आत्मविश्वास