जपान येथे सुरु असलेल्या बॅडमिंटन ओपन स्पर्धेत भारताला सपशेल निराशा प्राप्त झाली आहे. आशियाई क्रीडास्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, पी.व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांनी पुरुष आणि महिला एकेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत सिंधूला आणि प्रणॉयला साखळी सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या पुरुष दुहेरी जोडी मनू अत्री आणि बी सुमित रेड्डी यांना देखील उप- उपांत्य फेरीच्या पुढे जाण्यात अपयश आले.
किदाम्बी श्रीकांत हा भारताचा एकमेव खेळाडू स्पर्धेच्या पुढच्या फेरीस पात्र ठरला होता. मात्र आज श्रीकांतला देखील पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे भारताचे जपान ओपन मधले आव्हान संपुष्टात आले आहे.
श्रीकांतने तब्बल एक तास एकोणीस मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिला सेट आपल्या नावे करून देखील सामना गमावला. श्रीकांतचा कोरियाच्या ली डाँग क्यूनने उप-उपांत्य फेरीत २१-१९, १६-२१, १८-२१ असा पराभव केला.
सातव्या मानांकित श्रीकांत आणि इतर भारतीय खेळाडूंना सातत्याने सुरु असलेल्या स्पर्धांमुळे शरीरावर ताण आणि थकवा आल्याने स्पर्धेतल्या कामगिरीवर परिणाम झाला असावा असे अनेकांचे म्हणणे आहे.