कोलकाता| भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात ईडन गार्डन स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना (Second T20I) पार पडला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्याने त्यांना हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी होती. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील दिसला. दरम्यान वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्यासाठी हा सामना अतिशय विशेष राहिला.
पोलार्डचा हा कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना (100th T20I) होता. तो १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा जगातील नववा आणि वेस्ट इंडिजचा पहिलाच खेळाडू (West Indies First Player) ठरला आहे.
सर्वाधिक टी२० सामने खेळण्याच्या विक्रमांत पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक १२४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तर भारताच्या टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी२० सामना हा त्याचा कारकिर्दीतील १२१ वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे क्रिकेटर (Most T20I Played Cricketers):
१२४- शोएब मलिक
१२१ – रोहित शर्मा
११९ – मोहम्मद हाफिज
११५ – इयॉन मॉर्गन
११३ – महमुदुल्लाह
११२ – मार्टिन गुप्टिल
११० – केविन ओब्रायन
१०२ – रॉस टेलर
१०० – कायरन पोलार्ड*
A century of T20Is for @KieronPollard55 💯#INDvWI pic.twitter.com/Lbvg3DOWV4
— ICC (@ICC) February 18, 2022
वेस्ट इंडिजच्या संघाने पोलार्डच्या कारकिर्दीतील या विशेष क्षणाला अजूनच विशेष बनवले. सामना सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या सर्व खेळाडूंनी आणि संघ प्रशिक्षकांनी एकत्र जमून त्याला या शतकासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच टी२० संघाचा उपकर्णधार निकोलस पूरन याने १०० क्रमांकाची जर्सी त्याला भेट दिली. तसेच या सामन्यातून वेस्ट इंडिजच्या टी२० संघात पुनरागमन करत असलेल्या अष्टपैलू जेसन होल्डर याने त्याला कॅप देत त्याचा सन्मान केला. आयसीसीने त्यांच्या या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
तसेच पोलार्डच्या टी२० कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने आतापर्यंत १०० टी२० सामने खेळताना २५.५९ च्या सरासरीने १५६१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसरी टी२०: नाणेफेक जिंकून पोलार्डचा गोलंदाजीचा निर्णय, वेस्ट इंडिज संघात खतरनाक अष्टपैलूचे पुनरागमन
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा