युएई येथे खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) वेस्ट इंडीज आणि बांगलादेश हे संघ समोरासमोर आले. सलग दोन पराभवानंतर वेस्ट इंडीजने विजय मिळवत आपले खाते खोलले. तर दुसरीकडे, सलग तिसऱ्या पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्याच वेळी, या सामन्यात एक निराळी घटना पाहायला मिळाली.
अशी घडली घटना
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड अगदीच कासवगतीने खेळत होता. डावाच्या तेरावा षटकादरम्यान एक धाव काढून तो मैदानाबाहेर निघून गेला. क्रिकेटच्या मैदानावर अशी घटना क्वचितच घडत असते. बाद अथवा दुखापतग्रस्त न होता तो बाहेर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्याने मैदान सोडण्यापूर्वी १६ चेंडूंमध्ये केवळ ८ धावा काढल्या होत्या. पोलार्ड मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याच्या जागेवर अष्टपैलू आंद्रे रसेल फलंदाजीसाठी आला.
रसेल आपले खातेही न खोलता धावबाद होत माघारी परतला. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. अखेरच्या षटकात ड्वेन ब्रावो बाद झाल्यानंतर पोलार्ड पुन्हा मैदानात आला व त्याने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाची धावसंख्या १४२ पर्यंत नेली.
वेस्ट इंडीजचा थरारक विजय
नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने ७ बाद १४२ पर्यंत मजल मारली. निकोलस पूरन (४०), रोस्टन चेज (३९) व जेसन होल्डर (नाबाद १५) यांनी संघासाठी उपयुक्त योगदान दिले. बांगलादेशसाठी शोरीफुल इस्लाम, मेहदी हसन व मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी केली. जेसन होल्डर, रवी रामपॉल व अकील हुसेन यांनी आपल्या चार षटकांमध्ये २५ पेक्षा कमी धावा देत बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवले. लिटन दास (४४) व कर्णधार महमदुल्लाह (नाबाद ३१) यांचे प्रयत्न हातात पाच गडी असूनही तोकडे पडले. अखेरच्या चेंडूवर रंगलेल्या सामन्यात बांगलादेशला तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जावया’ला चीयर करण्यासाठी दुबईत पोहोचला शाहीद आफ्रिदी, मुलींनाही नेलं सोबत; फोटो व्हायरल
‘बुमराहवर जास्त अवलंबून राहू नका’, मुरलीधरनचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला