क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) सुरुवात येत्या २६ मार्चपासून होत आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स संघाची कमान दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीने २०२१ आयपीएलनंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बेंगलोर संघाने हा निर्णय घेतला. आता विराट डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. यापूर्वी विराटने डू प्लेसिसचे कौतुक केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारातील कर्णधार नाहीये. ३३ वर्षीय विराटने ९ वर्षे बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्याला आपल्या संघाला एकदाही आयपीएलचा किताब जिंकून देता आला नाही. नेहमीप्रमाणे कागदोपत्री मजबूत दिसणाऱ्या बेंगलोर संघाचे खेळाडू यावेळी जोरदार तयारी करत आहेत. विराट सोमवारी (२१ मार्च) बेंगलोर संघाच्या शिबिरात जोडला गेला. तो श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत कसोटी मालिकेनंतर थेट मुंबईत आपल्या कुटुंबाला भेटायला गेला होता. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर विराटने पुन्हा क्रिकेटची वाट धरली आणि आता तो तयारी करण्यात मग्न झाला आहे.
आता बेंगलोर संघाचे नेतृत्व चार वेळचा आयपीएल विजेता फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) करणार आहे. त्याला मागील महिन्यात झालेल्या लिलावात ७ कोटी रुपयांमध्ये बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. डू प्लेसिस यापूर्वी ४ वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. बेंगलोरने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट म्हणाला की, “लिलावात डू प्लेसिसला निवडण्याची आमची योजना स्पष्ट होती. आम्हाला अशा कर्णधाराची आवश्यकता होती, जो खूप सन्मानित असेल. तो कसोटी कर्णधार राहिला आहे आणि तो खूप चांगला क्रिकेटपटूही आहे. बेंगलोरमध्ये आम्ही त्याच्या नेतृत्वासाठी खूप उत्सुक आहोत. तो आपली भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडेल.”
“आम्हा सर्वांचे डू प्लेसिससोबत चांगले नाते आहे. मला विश्वास आहे की, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि इतर सर्व खेळाडू त्याच्या नेतृत्वात या स्पर्धेचा आनंद घेतील. हे अविश्वसनीय आहे की, आयपीएलने इतका लांबचा पल्ला गाठला आहे. मी नवीन ऊर्जासोबत इथे आहे. कारण, मी खूप जबाबदाऱ्या आणि कर्तव्यातून मुक्त झालो आहे,” असेही पुढे बोलताना विराट म्हणाला.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएल २०२२मधील बेंगलोर संघाचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध २७ मार्च रोजी होणार आहे.






