जगातील प्रतिष्ठित टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम २६ मार्चपासून खेळला जाणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या इतिसाहात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (५ आयपीएल ट्रॉफी) आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (४ आयपीएल ट्रॉफी) या दोघांनी एकहाती राज्य केले आहे. आगामी हंगामात रोहित आणि धोनीव्यतिरिक्त एकही असा कर्णधार नाहीय, ज्याने याआधी कधी आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.
आयपीएल २०२२साठी (IPL 2022) बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलावात केकेआरने श्रेयस अय्यर आणि रॉयल चॅलेंजर्स बेगलोरने (RCB) फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) या गुणवंत खेळाडूंना खरेदी केले. केकेआर आणि आरसीबीने या दोघांनाच संघाचे कर्णधारपद सोपवले. तसे पाहिले तर, दक्षिण आफ्रिकी दिग्गज डू प्लेसिस आयपीएल २०२२चा सर्वात फायदेशीर कर्णधार ठरला आहे. त्याच्यासाठी आरसीबीने मेगा लिलावात ७ कोटी रुपये खर्च केले, तर दुसरीकडे भारतीय दिग्गज केएल राहुल (KL Rahul) याला कर्णधार बनवण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल १७ कोटी खर्च करून त्याला संघात रिटेन केले होते. तो आयपीएल हंगामातील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे. डू प्लेसिस आणि श्रेयस अय्यर हे दोन कर्णधार असे आहेत, जे त्यांच्या संघांना मेगा लिलावादरम्यान हाती लागले आहेत. उरलेले ८ कर्णधार हे त्यांच्या संघाने आधीच रिटेन केलेले आहेत.
कर्णधारांसोबतच सपोर्ट स्टाफची भूमिका महत्वाची
आयपीएलमध्ये आमने-सामने येणाऱ्या १० संघांसाठी कर्णधाराची भूमिका जेवढी महत्वाची आहे, तेवढीच महत्वाची भूमिका आहे, प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफची. रोहित शर्माला ५ ट्रॉफी जिंकून देण्यासाठी त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकर, प्रशिक्षक महेला जयवर्धने, संचालक जहीर खान यांचे सल्ले मिळाले आहेत. तसेच ४ आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीला त्याच्या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर ज्या योजना तयार करेल, त्यामध्ये प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम आणि मेंटॉर डेविड हसी यांचा सहभाग असेल. डू प्लेसिसला मार्गदर्शन करण्यासाठी आरसीबीकडे संचालक माईक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतकडे दिग्गज रिकी पॉंटिंग, शेन वॉटसन, अजित आगरकर, प्रवीण आमरे असे दिग्गज उपस्थित आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या केन विलियम्सनच्या मदतीसाठी प्रशिक्षक टॉम मुडी, सायमन कॅटिच आणि गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन उपस्थित असतील. पांजाब किंग्ज संघात अनिल कुंबळे, जाँटी ऱ्होड्स अशा दिग्गजांकडून कर्णधार मयंक अगरवाल सल्ले घेईल.
राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधार संजू सॅमसनच्या मदतीसाठी माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारा, लसिथ मलिंगा यांचा समावेश असेल. लखनऊच्या केएल राहुलसाठी केकेआरला दोन आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिलेला गौतम गंभीर मेंटॉरच्या भूमिकेत असेल, तसेच एँडी फ्लॉवरचाही सल्ला त्याला मिळेल. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) सोबत आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांचा अनुभव असेल.
आगामी आयपीएलमध्ये ८ भारतीय, तर २ कर्णधार असतील विदेशी
आयपीएल २०२२ मधील संघांच्या कर्णधारांपैकी ८ कर्णधार हे भारतीय असतील. सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी हे दोन संघ असे आहेत, ज्यांनी केन विलियम्सन आणि फाफ डू प्लेसिस या विदेशी दिग्गजांवर विश्वास दाखवला आहे.
तीन कर्णधार पहिल्यांदाच करतील आयपीएल संघाचे नेतृत्व
आगामी हंगामात तीन संघांचे कर्णधार असे आहेत, ज्यांनी यापूर्वी कधीच आयपीएल संघाचे नेतृत्व केले नाहीय. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवाल, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, या तिघांसाठी आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये कोणत्या मैदानावर येणार सर्वाधिक प्रेक्षक? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
Video: अन् कॅमेराला पाहून चालू सामन्यात चिडला स्टीव्ह स्मिथ, पाहा नक्की झालं तरी काय
फाफ डू प्लेसिस गेल्याने उमदा सलामीवीराच्या शोधात आहे सीएसके, ‘हे’ दोघे घेऊ शकतात जागा