प्रेक्षक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती स्पर्धा म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) होय. आयपीएलला ४ दिवसांनी म्हणजेच २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमधील ८ संघांची संख्या २ने वाढून १०वर गेली आहे. या १० संघांमध्ये साखळी सामन्यात एकूण ७० सामने खेळले जाणार आहेत. हे सामने मुंबईच्या ३ आणि पुण्यातील एका स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे यावर्षी आयपीएल संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. मात्र, असे असले, तरीही मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडिअमवर काही सामने खेळायला मिळणार आहेत. प्ले-ऑफच्या ४ सामन्यांचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर चाहत्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अद्याप महाराष्ट्र सरकारकडून २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “स्पर्धा पुढे जाईल, तेव्हा प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होईल. कोरोनाच्या प्रकरणांच्या कमतरतेमुळे अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, अधिक संख्येने प्रेक्षक स्टेडिअममध्ये येऊ शकतील.”
वानखेडे स्टेडिअमच्या सध्याच्या नियमानुसार ९८०० ते १० हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये येऊ शकतील.
पुणे आणि डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये सर्वाधिक प्रेक्षक
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये ७ ते ९ हजार प्रेक्षक, तर मुंबईच्याच डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये ११-१२ हजार आणि पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये १२ हजार प्रेक्षक येऊ शकतील. अशाप्रकारे डी. वाय. पाटील आणि एमसीए स्टेडिअममध्ये प्रेक्षक सामन्याचा जास्त आनंद घेऊ शकतील. मागील काही दिवसांमध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान धरमशाला, कोलकाता, मोहाली आणि बंगळुरू येथील स्टेडिअमवर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते. यामुळे बीसीसीआयलाही दिलासा मिळाला होता.
यादरम्यानच बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडून सर्व राज्य असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअममध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
आयपीएल २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या २ संघांमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. आता आयपीएलमध्ये हे दोन संघ काय कमाल करतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्स क्रिकेट ते फुल व्हॉलीबॉल; ‘एमआय अरेना’मध्ये पलटणची धमाल मस्ती, व्हिडिओ बनवेल तुमचा दिवस
फाफ डू प्लेसिस गेल्याने उमदा सलामीवीराच्या शोधात आहे सीएसके, ‘हे’ दोघे घेऊ शकतात जागा