2020 आयपीएल मोसमासाठी किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात फिरकीपटू आर अश्विन कायम राहणार असल्याचे पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. अश्विन मागील दोन आयपीएल मोसमात पंजाब संघाचा कर्णधार होता.
मागील काही दिवसांपासून पंजाब संघ अश्विनचे प्लेअर ट्रान्सफरमध्ये ट्रेडींग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सबरोबर चर्चा करत असल्याचे वृत्त येत होते. पण आता अश्विन पंजाबच्याच संघाकडून 2020 आयपीएल खेळणार असल्याचे पक्के झाले आहे.
याबद्दल वाडिया म्हणाले, ‘किंग्स इलेव्हन पंजाबच्या बोर्डाने पुन्हा विचार केला आणि लक्षात आले की अश्विन संघाचा अविभाज्य भाग आहे. दिल्ली कॅपिटल्सबरोबर चर्चा सुरु होती पण ती चर्चा निष्फळ ठरली. तो ज्याप्रकारे त्याचे क्रिकेट खेळतो आणि त्याची कामगिरीच त्याला सिद्ध करते.’
अश्विनला पंजाबने 2018 मध्ये आयपीएल लिलावात खरेदी करुन संघात सामील करुन घेतले होते. तसेच याच मोसमात त्यांनी त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती. पण अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला 2018 आणि 2019 या मोसमात मोठे यश मिळवण्यात अपयश आले.
अश्विनने पंजाबसाठी 2018 आणि 2019 या दोन मोसमात मिळून 28 सामने खेळले. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ 2018 आणि 2019 मोसमात गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.
अश्विनला सोमवारी मिळाली दुसरी गुडन्यूज!
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अश्विनने मोठी झेप घेतली आहे. तो आता गोलंदाजांच्या यादीत 10 व्या क्रमांकावरुन 7 व्या क्रमांकावर आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अश्विन पहिल्या 10 गोलंदाजांच्या यादीतून बाहेर गेला होता. पण त्याने पहिल्या कसोटी सामन्यानंतर 10 व्या क्रमांकावर झेप घेतली आणि आता दुसऱ्या कसोटीनंतर तो 7 व्या क्रमांकावर आला आहे.






